हार्दिक पांड्या(फोटो-सोशल मिडिया)
Hardik Pandya’s explosive batting after injury : क्रिकेटपासून जवळजवळ दोन महिने दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पुन्हा मैदानात परतला आहे. हार्दिक पंड्या मैदानात परतला आणि त्याने टी-२० फॉरमॅटमधील तो सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून का ओळखले जाते, ही पुन्हा एकदा आपल्या खेळीने सिद्ध केले आहे. पंजाबविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात, हार्दिक पंड्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे बडोद्याने एक संस्मरणीय विजय आपल्या नावावर केला आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना, त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि संघाला कठीण लक्ष्य गाठून देण्यात मोठे योगदान दिले आहे.
२२३ धावांचे मोठे लक्ष केले पार
पंजाब संघाने दिलेल्या २२३ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा सामना करताना, बडोद्याने दमदार सुरुवात केली. सलामीवीर विष्णू सोलंकी आणि शाश्वत रावत यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि पहिल्या पाच षटकांत धावसंख्या ६० च्या पुढे नेऊन ठेवली. शाश्वतने ३१ चेंडूत ४३ धावा केल्या, तर विष्णूही २१ चेंडूत ४३ धावा करत माघारी गेला.
दोन्ही सलामीवीरांच्या बाद झाल्यानंतर, असे वाटू लागले होते की, धावगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु नंतर हार्दिक आणि शिवालिक शर्माने डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी रचत पंजाबच्या गोलंदाजांना झुलवले.
शिवालिक शर्मा ३१ चेंडूत ४७ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला, परंतु दुसऱ्या टोकाला हार्दिक पंड्या चांगल्याच आक्रमक अंदाजात खेळताना दिसत होता. त्याने ४२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारत ७७ धावा फटकावल्या.
हार्दिक पंड्याने सुरुवातीला स्ट्राईक रोटेट केला, परंतु तो सेट झाल्यावर त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या खेळीमुळे बडोद्याला सामना त्यांच्या बाजूने वळवण्याची उत्तम संधी मिळाली आणि परिणामी संघाने ५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा Syed Mushtaq Ali Trophy मध्ये धूमधडाका! शतक झळकावून केला ‘हा’ पराक्रम
हार्दिक पंड्या गोलंदाजीत अपयशी
हार्दिक पंड्याची फलंदाजीमध्ये दम दाखवला असला तरी त्याची गोलंदाजी मात्र अपेक्षेनुसार राहिली नाही. त्याने ४ षटकांत ५२ धावा दिल्या आणि यामध्ये त्याला फक्त एकच बळी घेता आला. पंजाबकडून अभिषेक शर्माने १८ चेंडूत जलद अर्धशतक झळकावले, तर अनमोलप्रीत सिंगने ६९ धावांची जलद खेळी साकारली. शेवटी, नमन धीरने २८ चेंडूत ३९ धावा जोडून संघाला २२२ धावांपर्यंत नेण्यात मोठी कामगिरी बजावली.






