ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीन, नवीन कसोटी संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, पाकिस्तान संघ एकूण ७५ रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर होता, तर कसोटी मालिका संपल्यानंतर तो आता नवव्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याचे एकूण रेटिंग गुण ७१ झाले आहेत. त्यांच्या खाली फक्त झिम्बाब्वे असून, तो १७ रेटिंग गुणांसह दहाव्या स्थानावर तळाशी आहे. इंग्लंड संघ अजूनही पाचव्या स्थानावर आहे, ज्यात त्याच्या रेटिंग गुणांमध्ये सुधारणा झाली आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे एकूण रेटिंग गुण ९९ होते, तर आता ते १०२ झाले आहेत.
आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सध्या एकूण १२६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ११९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड १०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ १०५ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड पाचव्या, तर बांग्लादेश ७८ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंका ७५ रेटिंग गुणांसह सातव्या, तर वेस्ट इंडिज ७४ रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबास्टन स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकली आणि प्रथमच मायदेशात पाकिस्तानवर क्लीन स्वीप केला. इंग्लंडला विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे इंग्लंड संघाने २४.२ षटकांत २ विकेट्स गमावून पूर्ण केले.






