ड्यूक बॉल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले असून या मध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाईल. या मालिकेदरम्यान, ड्यूक बॉलवर बरीच टीका करण्यात आली. त्यानंतर आता कंपनीकडून मोठा निर्णय घेण्यात आला. याबाबत कंपनी मालकाने सांगितले की चेंडू लवकर खराब झाला आहे की नाही याबाबत आता तपासणी करण्यात येईल.
ड्यूक बॉल कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी यापूर्वी चेंडू योग्य असल्याचे सांगितले होते. त्यांनी चेंडू लवकर खराब होण्याची अनेक कारणे देखील दिली होती, परंतु आता सततच्या तक्रारींनंतर, त्यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की आम्ही चेंडूची तपासणी करू आणि आवश्यक पावले उचलू. चेंडू चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
हेही वाचा : न्यूझीलंडला टी-२० तिरंगी मालिकेदरम्यान मोठा झटका! झिम्बाब्वे दौऱ्यातून ‘हा’ तडाखेबाज खेळाडू बाहेर
भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या ड्यूक बॉलवर टीका केली होती. या टीकेनंतर, इंग्लंड बोर्डाने वापरलेला ड्यूक बॉल कंपनीला परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड या आठवड्याच्या अखेरीस ड्यूक कंपनीला शक्य तितके चेंडू परत करणार आहे.
बीबीसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, ड्यूकचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेडचे मालक दिलीप जाजोदिया यांनी सांगितले कि, आम्ही वापरलेल्या चेंडूंची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर, आम्ही ते तयार करणाऱ्या लोकांशी बोलणार आहोत. आवश्यक ती पावले उचलली जातील. पुनरावलोकनानंतर, जर आम्हाला वाटत असेल की चेंडू बदलण्याची गरज आहे, तर आम्ही ते देखील करण्यास तयार आहोत. या तपासणीनंतर अनेक गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे.
भारत आणि इंग्लड यांच्यातील मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या काळात पंचांना सतत चेंडू बदलावा लागत आहे. या प्रकारच्या पृष्ठभागावर ड्यूक चेंडू लवकर खराब होत असून सुमारे ३० षटकांच्या वापरानंतर चेंडू खराब होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये देखील विलंब होत असल्याचे पाहायला मिळाले. आता चौथ्या कसोटीत कोणत्या प्रकारचा चेंडू दिला जातो हे पाहणे रंजक असणार आहे.
त्याच वेळी, यजमान बोर्ड कसोटी मालिकेत चेंडू वापरण्याचा निर्णय घेत असते. आतापर्यंत ड्यूक बॉल इंग्लंडमध्ये वापरण्यात येत आहे. त्याच वेळी, भारतात एसजी बॉल वापरला जातो. तर ऑस्ट्रेलियामध्ये कुकाबुरा बॉलचा वापर होतो. ड्यूकचा चेंडू १७६० पासून तयार करण्यात येत आहे. परंतु, अलीकडेच कंपनीला चेंडूबाबत टीका सहन करावी लागत आहे.
हेही वाचा : ना रोहित ना गिल! ॲडम गिलख्रिस्टच्या मते ‘हा’ खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज