टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामना ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट इतिहासाच्या ९३ वर्षांमध्ये प्रथमच पाच डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवले आहे.
पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. यापूर्वी भारताकडून चार डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात खेळवण्यात आले होते. परंतु भारतीय संघाला पाच डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
भारतीय संघाने तब्बल ५९२ सामन्यांनंतर हा कारनामा केला आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. तामिळनाडूचा बी साई सुदर्शन आणि मुंबईचा शार्दुल ठाकूर गेल्या दोन सामन्यांमध्ये संघातुन वगळण्यात आले होते. आता ते परत संघात परतले आहेत. करुण नायरच्या जागी सुदर्शन संघात परतला आहे. आता तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तर शार्दूल ठाकूरला नितीश कुमार रेड्डीच्या जागी संघात स्थान दिले गेले आहे. नितीश कुमार रेड्डी सोमवारी (२१ जुलै) गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता.
याशिवाय, २४ वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज देखील मँचेस्टरमध्ये भारताकडून पदार्पण करत आहे. हरियाणाच्या या क्रिकेटपटू आकाश दीपच्या जागी संघात संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा ऋषभ पंत, लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी बोटाला दुखापत झाल्यानंतर मँचेस्टर टेस्टमध्ये खेळणे संकटात आले होते, परंतु तो वेळेत बरा झाला असून त्याचे संघात स्थान अढळ राहिले आहे.
हेही वाचा : अखेर संसदेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक सादर! आता BCCI ही येणार कायद्याच्या चौकटीत; काय आहेत तरतुदी..?
पंतने सद्या चालू असलेल्या मालिकेत त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात दोन शतके (१३४ आणि ११८) आणि एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत २५ आणि ६५ धावा फाटकावल्या होत्या. तसेच त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पंतने दुखापतीशी झगडत असताना देखील ७४ आणि ९ धावा केल्या होत्या.