केएल राहुल(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलने दमदार शतक झळकावले. हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात केएल राहुलने २०२ चेंडूत शतक झळकावले. या शतकासह, राहुलने मोठी कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये तीन कसोटी शतके झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
याआधी सलामीवीर फलंदाज म्हणून, सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून भारतासाठी प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर जमा आहे. द्रविडने इंग्लंडमध्ये भारतासाठी १३ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये सहा वेळा १०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्यानंतर दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर यांचा नंबर लागतो. ज्यांच्याकडे प्रत्येकी चार शतके जमा आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : चौथ्या दिवशी केएल राहुलचे दमदार शतक! इंग्लंडविरुद्ध भारताकडे २४० धावांची भक्कम आघाडी..
सप्टेंबर २०१८ मध्ये ओव्हल कसोटीदरम्यान केएल राहुलने इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून भारतासाठी पहिले कसोटी शतक झळकावले होते. दुसऱ्या डावात त्याने २२४ चेंडूंचा सामना केला आणि २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४९ धावांची खेळी केली होती. इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून त्याचे दुसरे कसोटी शतक लॉर्ड्सवर आले होते. २०२१ मध्ये १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने २५० चेंडूत १२९ धावा केल्या होत्या.
राहुलने इंग्लंडविरुद्ध एकूण चार कसोटी शतके झळकावली आहेत. पाच दिवसांच्या खेळाच्या स्वरूपात त्याची सर्वोत्तम धावसंख्या १९९ राहिली आहे, जी त्याने डिसेंबर २०१६ मध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध केली होती. त्या सामन्यात त्याने भारताकडून डावाची सुरुवात केली आणि ३११ चेंडू खेळताना १६ चौकार आणि ३ षटकार मारले होते. इंग्लंडमध्ये तीन कसोटी शतकांव्यतिरिक्त, राहुलने भारतासाठी इंग्लंडमध्ये टी-२० शतक देखील लगावले आहे.