जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने करुण नायरचा झेल टिपून एक इतिहास नोंदवला आहे. जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. क्षेत्ररक्षक म्हणून, जो रूटने २११ झेल घेण्याची किमया साधली आहे. असे करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासामध्ये महान जोम रूटपेक्षा जास्त झेल कोणत्याही खेळाडूला घेता आलेले नाहीत.
इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज फलंदाज जो रूटने भारताच्या पहिल्या डावाच्या २१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर करुण नायरचा अप्रतिम झेल टिपला. या झेलने त्याने राहुल द्रविडला देखील मागे टाकले. भारताचा राहुल द्रविड २१० झेलांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे, तर श्रीलंकेचा महेला जयवर्धने २०५ झेलांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनी २०० झेल पूर्ण केले असून स्टीव्ह स्मिथला जो रूटला मागे टाकण्याची संधी असणार आहे.
लॉर्ड्स येथे खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला नायर चांगल्या लयीत दिसून आला. ता, पण आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्यापूर्वीच बेन स्टोक्सचा एक शानदार चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून थेट पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रूटकडे गेला. रूट डावीकडे डायव्ह करून एका हाताने एक शानदार झेल टिपला. रूटचा हा शानदार झेल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर शेअर केला आणि काही वेळातच हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर करुण नायरचा झेल रूटने घेतला. या झेलसह रूटने अॅलिस्टर कुकला देखील मागे टाकत एक नवीन विक्रम रचला आहे. या झेलसह, रूटने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३९ झेल घेतले आहेत, तर अॅलिस्टर कुकने यापूर्वी ३८ झेल घेण्याची किमया साधली होती. करूण नायरचा झेल टिपल्याने रूट आता भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे.
जो रूटने १३ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून, तो भारताविरुद्ध ३३ कसोटी सामने खेळला आहे आणि या काळात त्याने ३९ झेल घेतले आहेत. भारताविरुद्ध क्षेत्ररक्षक म्हणून कोणत्याही खेळाडूने केलेले हे सर्वाधिक आहे.