सरफराज अहमदकडून चालू सामन्यात फोन वापरला(फोटो-सोशल मीडिया)
Sarfaraz Ahmed is using a mobile phone: २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना काल क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान अंडर १९ मार्गदर्शक सरफराज अहमद डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसून आला. त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. ऑनलाइन फिरणाऱ्या स्क्रीनशॉट आणि क्लिप्समध्ये सरफराज खेळाडूंच्या परिसरात बसून मोबाईल फोनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंवर वापरकर्ते प्रश्न विचारत आहेत की सरफराज अहमदकडून आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे का?
तथापि, सोशल मीडियावरील गोंधळ उडाल्यानंतर, आयसीसीकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की सरफराज अहमदला फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. कारण तो या अंडर १९ विश्वचषकात पाकिस्तान संघाचा संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक अशा दोन्ही भूमिकेत आहे. म्हणूनच सरफराजला काही विशेषाधिकार दिले गेले आहेत.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताने अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर ६ सामन्यात पाकिस्तानचा ५८ धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह, भारतीय संघाने सेमीफायनल २ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत वेदांत त्रिवेदीच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा केल्या. प्रतिउत्तरात पाकिस्तान संघ ४६.२ षटकात १९४ धावांवर गारद झाला आणि भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. जिथे त्यांचा सामना ४ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला ३३.३ षटकांत विजय मिळवणे आवश्यक असताना, भारतीय संघाने केवळ सेमीफायनलमध्ये स्थानच निश्चित केले नाही तर सामना देखील आपल्या खिशात टाकला.
पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा
भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन






