भाजपला महापालिकेतील सत्तेसाठी कुबड्या नकोत! महानगराध्यक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाबाबत महाजन अनभिज्ञ
नाशिक : महायुतीने भाजप-शिंदेंनी बहुमत मिळवलं असून त्यांचाच महापौर होणार हे निश्चित असून या निकालाल 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही महापौर पदाचा निर्णय काहीही झालेला नाही. अशातच भाजपला सत्तेसाठी कुबड्या नकोत. आम्ही स्वंत्रत लढालो. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही कुबड्या घेतल्या जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती मंत्री गिरीश महाजन यांनी केली. मात्र, राज्यात सत्तेत आहोत. त्यामुळे महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घ्यावे, असा प्रस्ताव भाजपच्या महानगराध्यक्ष दिल्याबाबत महाजन अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित होतो.
मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, आमचे ७२ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे त्यांच्यातच महत्त्वाची पदे वाटली जाणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला विराम मिळला आहे. नाशिक महापालिकेत १२२ जागेपैकी भाजपचे ७२, शिवसेना शिंदे गटाचे २६ व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहे. महायुतीत असलेल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली तर शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाने युती केली होती. निवडणुकीनंतर भाजपने बहुमतापेक्षा १० जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाने विरोधात बसण्याची तयारी केली होती.
दरम्यान भाजपचे महाशहराध्यक्ष सुनील केदार यांनी केंद्र व राज्यात सत्तेत हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांनी सत्तेत यावे असे आवाहन केले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने चांगला प्रस्ताव आला तर विचार करु असे सांगितले, त्यामुळे एकत्र आल्यास शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर जाईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण, आता मंत्री महाजन यांनी या सर्व चर्वेला पूर्णविराम दिला आहे. मात्र, गिरीश महाजन यांना एकत्रीकरणाच्या प्रस्तावाची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न यानिमिताने चर्चिला जातो आहे.
अर्थसंकल्पाच्या पत्रकार परिषदेत नाशिकचा अर्थसंकल्प मांडणार कोण असेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मंत्री महाजन यांनी अजून वेळ असल्याचे उत्तर दिले. आज मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठांची चर्चा करुन नाव ठरवले जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री तसेच महाजन यांच्याकडे इच्छुकांचे जोरदार लॉबींग सुरू असल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






