तनुश कोटियन(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम मध्यात पोहोचला आहे. आतापर्यंत ४३ सामने खेळवण्यात आले आहेत. आज ४४ वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. आतापर्यंत सर्व संघांनी सुमारे ८ ते ९ सामने खेळले आहेत. अशातच पंजाब किंग्जने एक खेळी केली आहे. त्यांनी त्यांच्या संघात एका नवीन खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. पंजाब किंग्जने मुंबईचा डॅशिंग अष्टपैलू आणि भारतीय संघाचा खेळाडू तनुश कोटियनचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश करून घेतला आहे. मेगा लिलावात कोणत्याही संघाने तनुश कोटियनला खरेदी केले नव्हते.
आयपीएल २०२५ च्या लिलावात विक्री न झालेल्या कोटियनला या हंगामाच्या मध्यात पंजाब किंग्जने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पंजाब किंग्जच्या सराव सत्रादरम्यान, २६ वर्षीय कोटियन फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसून आला. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी देखील त्याच्याशी बोलत असल्याचे पाहायला मिळाले. पंजाब किंग्जकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल आहे तर पर्याय म्हणून त्यांच्याकडे हरप्रीत ब्रार आणि प्रवीण दुबे हे दोन लेग स्पिन आहेत.
नाईट रायडर्स संघाचे आव्हान समोर असताना पंजाबच्या तयारीत विविधता आणण्यासाठी पंजाबने ऑफ स्पिनर कोटियनला नेट बॉलिंगसाठी बोलावले. नाईट रायडर्सच्या संघात सुनील नारायण आणि इन-फॉर्म वरुण चक्रवर्तीसारखे स्टार स्पिनर यांचा समावेश आहे. या हंगामात मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा कोटियन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून आला आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोटियनला पंजाबशी जोडून घेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अय्यर आणि कोटियन दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सोबत मुंबई संघासाठी खेळतात. २०२४ मध्ये केकेआरला आयपीएल जेतेपद मिळवून देणारा अय्यर हा असा एक खेळाडू आहे की, जो विरोधी संघाला चांगलेच ओळखतो. कोटियन गुरुवारी हॉटेलमध्ये संघात सामील होऊन आणि थोडाही वेळ वाया न घालवता त्याने नेटमध्ये पंजाबच्या फलंदाजांना काही आव्हानात्मक षटके देखील टाकली.
२६ वर्षीय तनुश कोटियनने ३७ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने ११२ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये ३ वेळा ५ विकेट्स आणि ६ वेळा चार विकेट्स घेण्याचा समावेश आहे. तसेच त्याने १८०९ धावा देखील केल्या आहेत. ज्यामध्ये २ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.