रॉजर फेडरर(फोटो-सोशल मीडिया)
Roger Federer : टेनिसप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विम्बल्डनची सर्वाधिक ८ जेतेपदं नावावर करणारा यशस्वी खेळाडू रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे. रॉजर फेडररकडून ३ वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा करण्यात आली होती. रॉजर फेडरर आता शांघाय मास्टर्स २०२५ ची स्पर्धा खेळणार असल्याची माहिती आहे. निवृत्ती जाही केल्यानंतर तो पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसेल. १० ऑक्टोबर रोजी किझोंग स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या ‘रॉजर अँड फ्रेंड्स’ सेलिब्रिटी डबल्स स्पर्धेत तो भाग घेणार असल्याचे फेडररकडून सांगण्यात आले आहे.
रॉजर फेडरर २०१७ नंतर पहिल्यांदाच शांघायमध्ये खेळताना दिसणार आहे. २०१७ मध्ये रॉजरने याच ठिकाणी टेनिसमधील त्याचे दुसरे एकेरी जेतेपद जिंकले होते. ही दुहेरी स्पर्धा विशेष असणार आहे. फेडररसह अनेक सेलिब्रिटी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेता वू लेई, मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता डोनी येन आणि माजी डबल्स जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला झेंग जी हे देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला ग्रहण का लागले? रोहित शर्माच्या प्रशिक्षकाने केला ‘हा’ खळबळजनक खुलासा..
एका प्रमोशनल व्हीडिओ दरम्यान रॉजर फेडररने सांगितले की, “नमस्कार, मी रॉजर आणि शांघाय मास्टर्ससाठी किझोंग स्टेडियममध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत असून शांघाय हे नेहमीच माझ्यासाठी एक विशेष ठिकाण राहिलं आहे. येथील चाहते जबरदस्त आहेत आणि इथल्या आठवणी अविस्मरणीय अशा आहेत.”
शांघाय मास्टर्स १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. गतवर्षी खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद जानिक सिनर याने पटकावले होते. ज्याने अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा ७-६ (४), ६-३ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये लेव्हर कप दरम्यान फेडररने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याचा प्रतिस्पर्धी आणि मित्र असणाऱ्या राफेल नदालसह खेळताना त्याने त्याचा अखेरचा डबल्स सामना जॅक सॉक आणि फ्रान्सिस टियाफो विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यांना ४-६, ७-६ (२), ९-११ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
रॉजर फेडररने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. ज्यामध्ये विक्रमी आठ विम्बलडन जेतेपदांचा समावेश आहे. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये फेडररने स्टॅन वॉवरिंकासह पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्यपदकाही कमाई केली होती.