मुंबई/पुणे – २५ सप्टेंबर, २०२५ : आशिया कप 2025 ची स्पर्धा काल पार पडली, तर दिल्लीमध्ये पॅरा जागतिक चॅम्पियनशीप सुरु आहे. यामध्ये भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त महत्व हे क्रिकेटला दिले जाते त्यामुळे इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूवर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. कालपासून भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि आशिया कप जिंकला. त्याचबरोबर भारताची शीतल देवी हि देखील वर्ल्ड चॅम्पियन झाली. भारतीय महिला संघ देखील 30 सप्टेंबरपासून विश्वचषक खेळणार आहे त्यामुळे आता सर्वाचे लक्ष तिकडे असणार आहे.
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. पण त्याबाबतीत चर्चा न होणे हे सहाजिकच आहे. या खेळाना भारतामध्ये पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) तर्फे कु. कृति दवे, (प्रथम वर्ष एमबीए – एचआर) हिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात येत आहे. हैदराबाद येथे पार पडलेल्या पहिल्या आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कृतिने उज्वल कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उंचावले आहे.
कृतिने या स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली – दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक. तिने फाइट्स, पूमसे (मार्शल आर्ट्समधील संरचित सादरीकरण) आणि स्पीड इव्हेंट्स या प्रकारांमध्ये कौशल्यपूर्ण कामगिरी केली. विशेष म्हणजे, सात दमदार सामन्यांनंतर केवळ एका गुणाने विजय मिळवत तिने सुवर्णपदक पटकावले. कृति गेल्या आठ वर्षांपासून मार्शल आर्ट्स क्षेत्रात सातत्याने प्रशिक्षण घेत असून, तिची वाटचाल कराटेपासून सुरू झाली आणि त्यानंतर ती तायक्वांदोमध्ये पारंगत झाली.
याशिवाय, तिने जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही यश मिळवले असून, लहानपणी हॉकी आणि क्रिकेटमध्येही सहभाग घेतला आहे. परंतु खरी ओढ आणि आवड तिला मार्शल आर्ट्समध्येच सापडली. शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कठोर सराव यामध्ये संतुलन राखत, कृति आठवड्यातून चार दिवस अनेक तास सराव करते. आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व MIT-WPU च्या क्रीडा विभागाच्या पाठबळावर ती भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय बाळगून आहे.