चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूनी आपल्या लौकिकाला साजेसी कामगिरी करताना वेटलिफ्टिंग, नेमबाजी आणि कुस्ती या प्रकारांत पदके मिळविली. त्याबरोबरीने खो-खो आणि टेनिसमध्ये देखील खेळाडूनी आपापले सामने जिंकताना स्पर्धेतील आपली दमदार वाटचाल सुरूच ठेवली आहे. सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये २ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य पदक मिळविले आहेत.
कुस्तीत कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवेला सुवर्ण
कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवेने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कुस्तीतील ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने ७२ किलो गटातील सुवर्णपदकच्या लढतीत छत्तीसगढच्या अभिषेक निषादला ८-० गुण फरकाने लोळविले.
सुवर्णपदकावर आपली मोहर
अंतिम लढतीत अभिषेकला २ वेळा पॅसिव्ह मिळाले, त्याचा फायदा समर्थला झाला. मोक्याच्या क्षणी समर्थने थ्रो होल्डिंग करताना चार गुणाची कमाई केली. त्यामुळे समर्थला ६-० अशी भरभक्कम आघाडी मिळाली. समर्थने चपळाईने भारंदाज डाव टाकून पुन्हा २ गुण वसूल करत लढतीत निर्विवाद वर्चस्वासह सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली.
समर्थला पहिल्यापासून कुस्तीचे वेड
यापूर्वी देखील त्याने खेलो इंडिया स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. मात्र, यावर्षी जास्त सराव, मेहनत आणि प्रशिक्षण घेवून त्याने पदकाचा रंग बदलविला. पट्टणकोडोली, तालुका हातकानंगले, येथील असणार्या समर्थचे वडील टेम्पोचालक, तर आई शासनाच्या शाळेतील पोषण आहार तयार करणारी स्वयंपाकी आहे. अशा बेताच्या परिस्थितीतून आलेल्या समर्थला पहिल्यापासून कुस्तीचे वेड होते. त्याने सोमनाथ कामान्ना यांच्याकडे कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली. एक एक पायरी चढणार्या समर्थने अनेक शालेय, विभागीय तथा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. समर्थ सध्या ‘साई’मध्ये अमोल यादव यांच्याकडून कुस्तीचे मार्गदर्शन मिळवत आहे.
आदित्य ताटेला कांस्य
समर्थ म्हाकवेच्या आधी आदित्य ताटेने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. त्याने चूरशीच्या लढतीत झारखंडच्या बख कांचपवर ६-५ असा एका गुणाने निसटता विजय मिळवित पदकाला गवसणी घातली. उपांत्य लढतीत हरियाणाच्या अमरदीपकडून पराभव झाल्याने या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आदित्य ताटेचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत त्याने झारखंडचा तगडा मल्ल बख कांचपचे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या झोळीत एक पदक टाकले.
बागने (कागल, कोल्हापूर) या छोट्याशा गावातील आदित्य ताटेने तुकाराम चोपडे व रवींद्र पाटील यांच्याकडून कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले होते. सध्या एनआयएस प्रशिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य दोनवडे येथे सराव करत असतो. कुरूंदवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आदित्य ताटेने सुवर्णपदक जिंकले होते. भावाच्या खेळाने प्रभावीत होऊन आदित्यची बहिण गायत्री ताटेही आखाड्यात उतरली. तिनेही राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
महादेव वडार याने वेटलिफ्टिंगमध्ये ‘सोने’ उचलले
महाराष्ट्राच्या महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो गटात २५३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी त्याने स्नेच मध्ये ११३ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १४० किलो वजन उचलले. तो मूळचा कोल्हापूरचा असून गेली पाच सहा वर्षे पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी मध्ये उज्ज्वला माने व वसीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
त्याचे सुवर्णपदक निश्चित होणार
आज क्लीन व जर्क मध्ये त्याने १४० किलो वजन उचलण्याचा निर्धार केला होता त्यावेळी बाकीचे सर्वजण त्याच्यापेक्षा कमी वजनच उचलणार होते त्यामुळे त्यांनी पहिला प्रयत्न यशस्वी केला तरी त्याचे सुवर्णपदक निश्चित होणार होते. त्याने अतिशय आत्मविश्वास व अचूक तंत्र दाखवीत हे वजन उचलले आणि सुवर्णपदक निश्चित केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याला १५० किलो वजन उचलता आले नाही मग त्याने तिसरा प्रयत्न घेतलाही नाही.
आज मला मिळालेले सुवर्णपदक हे मी माझ्या वडिलांनाच अर्पण करीत आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर माझी आई शेतमजुरी करून आमचे घर चालवीत आहे. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून त्यांचेही मला नेहमी सहकार्य मिळत आहे असे सांगून महादेव म्हणाला माझ्या यशामध्ये क्रीडा प्रबोधिनी मधील सर्व प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये अनुष लोखंडे, निखिल कोळी यांची रुपेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या अनुष लोखंडे याने मुलांच्या ६१ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. स्नॅच मध्ये १०६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३१ किलो असे एकूण २३७ किलो वजन उचलले. ओडिशाच्या सदानंद बरीहा याने २४२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तो कल्याणचा रहिवासी असून सध्या तो संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात विजय रोहिला व तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याला योगेश शर्मा यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. खेलो इंडियातील त्याचे हे पहिलेच पदक आहे.
निखिल कोळी याने वेटलिफ्टिंगमधील मुलांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक जिंकून कौतुकास्पद यश संपादन केले. सांगली जवळील उमदी या खेडेगावात जन्म झालेल्या या खेळाडूने या स्पर्धेतील आपले हे पहिलेच पदक नोंदविले. निखिल याने ५५ किलो गटातील स्नॅच या प्रकारात ९३ किलो तर क्लीन व जर्क या प्रकारात ११९ किलो असे एकूण २१२ किलो वजन उचलले. तो त्याच्या खेडेगावातच संजय नांदणीकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याचे वडील शेती करतात. त्यांनाही खेळाची आवड होती व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना हे स्वप्न साकारता आले नाही. त्यांनी आपले क्रीडा क्षेत्रातील यश मिळवण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न आपल्या मुलाने करावे यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करीत त्याला सतत प्रोत्साहन दिले आहे.
निखिल हा इयत्ता सातवी पासून वेटलिफ्टिंग करीत आहे. तो सध्या एम. व्ही. महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. त्याला खेळामध्ये करिअर करायचे आहे. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक वेळा अव्वल संपादन केले आहे. वेटलिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी अपार मेहनत करण्याची त्याची तयारी आहे.