नामिबिया संघ(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-२० विश्वचषक २०२६ चे आयोजन करण्यात येणार आहे. जगातील अनेक अव्वल क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आता या स्पर्धेतसाठी नामिबियाने पात्रता मिळवली असून मोठी झेप घेतली आहे. हा संघ आता १६ वा पात्रता मिळवणार संघ बनला आहे. नामिबिया संघ आता भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या विश्वचषकात आपले कौशल्य दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
नामिबियाच्याआधी १५ संघांनी या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले होते. या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. अंतिम तीन संघांची निवड ८ ऑक्टोबर रोजी ओमानमध्ये सुरू होणाऱ्या आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता फेरीतून करण्यात येणार आहे. या पात्रता फेरीत जपान, कुवेत, मलेशिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, कतार, सामोआ आणि संयुक्त अरब अमिराती या संघांचा समावेश असेल.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल
भारत आणि श्रीलंका (यजमान), अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका (सुपर एट), पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड (आयसीसी रँकिंग), कॅनडा, नेदरलँड्स, इटली (प्रादेशिक पात्रता) आणि नामिबिया (आफ्रिका प्रादेशिक पात्रता).
आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेत टांझानिया संघाचा ६३ धावांनी पराभव करून नामिबियाने विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने २० षटकांत १७६ धावा उभ्या केल्या. नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने कर्णधाराची खेळी खेळत, ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या. जेजे स्मितनेही ४३ चेंडूंत ६१ धावांची खेळी करून महत्वाचे योगदान दिले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टांझानिया संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. टांझानियाकडून अभिक पटवाने सर्वाधिक ३१ धावा केल्या. नामिबियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ज्यामुळे विरोधी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
या विजयासह, नामिबिया आता २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पत्र ठरला आहे. हा संघ भारत आणि श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्या कामगिरीबद्दल उत्साहित असणार आहे. संघाने त्यांच्या खेळात ताकद दाखवली आहे आणि सर्व खेळाडू विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहेत.