Maharashtra Kesari Competition
पुणे : स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने तसेच ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari Wrestling Tournament) किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. काल या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. दरम्यान, 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत नांदेडचा (Nanded) पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला आहे. नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.
[read_also content=”भारत-श्रीलंका यांच्यात आज फायनल! लंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी? सामना कुठे व कसा पाहणार… https://www.navarashtra.com/sports/india-and-sri-lanka-today-final-match-india-attempt-to-give-a-clean-sweep-to-lanka-these-players-will-get-a-chance-where-and-how-to-watch-the-match-361766.html”]
एवढ्यावरच थांबायचे नाही
दरम्यान, स्पर्धा जिंकल्यानंतर शिवराजने सांगितलं की, ” मी एका सामान्य घरातील मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आहे. माझ्या वडिलांना मला ऑलम्पिकमध्ये खेळताना बघायचं आहे आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने लढणार आहे.” महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आता शिवराजने जिंकली आहे. पण आता फक्त एवढ्यावर तो थांबणार नाही. कारण शिवराजला आता ऑलिम्पिकमध्ये खेळायचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. असं शिवराजने सांगितले आहे, त्यामुळं आता सर्व स्तरातून शिवराजचे कौतूक होत आहे.
बक्षिसांची खैरात…
उपांत्य सामन्यात माती विभागातून पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिंकदर शेखचा पराभव केला. तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला. त्यामुळं महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे याला केसरी गदा रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ…
कुस्तीपटूंच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरीच्या कार्यक्रमात केली. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीपटूंचे मानधन ६ हजार वरून २० हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजार वरून २० हजार तर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम ए हिंद या कुस्तीगिरांचे मानधन ४ हजार वरून १५ हजार इतके करण्यात येईल. तसेच कुस्तीगिरांचे निवृत्ती वेतन अडीच हजारांवरून साडे सात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले.