केशव महारजने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan vs South Africa 2nd Test Match : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दूसरा सामना खेळला जात आहे. रावळपिंडी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान ३३३ धावांवर गदगडला आहे. संघाची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीतील फलंदाज मैदानावर तग धरू शकले नाहीत. सलामीवीर अब्दुल्ला शफीक, कर्णधार शान मसूद आणि सौद शकील यांनी शानदार अर्धशतके झळकावून संघाला चांगल्या स्थितीकडे पोहचवले, परंतु उर्वरित फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. विरोधी गोलंदाजांनी अचूक लाईन आणि लेंथसह शानदार कामगिरी केली. खालच्या फळीतील फलंदाज देखील प्रभाव पाडू शकले नाहीत आणि संघ ३३३ धावांवर गारद झाला.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान संघाला इमाम-उल-हक (१७) ३५ धावांवरच बाद झाल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतर अब्दुल्ला शफीकने कर्णधार मसूदसह दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरण्यास मदत केली.
शफीक १४६ चेंडूचा सामना करत ५७ धावांवर बाद झाला, त्याने यामध्ये चार चौकार मारले. त्यानंतर बाबर आझम (१६) बाद झाला. पाकिस्तानची तिसरी विकेट १६७ धावांवर गेली. त्यानंतर, कर्णधार मसूदने सौद शकीलसह चौथ्या विकेटसाठी ४५ धावा जोडून संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिली.मसूद १७६ चेंडूत ८७ धावा करून तो बाद झाला.
पाकिस्तानने २४६ धावांवर मोहम्मद रिझवानचा महत्वाचा गडी गमावला. त्यानंतर, सलमान आघा आणि सौद शकील यांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावा जोडून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यास हातभार लावला. आघा ४५ धावांवर बाद माघारी गेला, तर शकीलने ६६ धावा काढल्या.
केशव महाराजची जादुई गोलंदाजी
फिरकी गोलंदाज केशव महाराजने पाकिस्तानच्या डावात ४२.४ षटके टाकली आणि १०२ धावा देत ७ बळी घेण्याची किमया साधली. सायमन हार्मरनेही दोन बळी टिपले आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने उर्वरित एक बळी घेतला.
हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९३ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. यजमान संघ हा सामना जिंकून २-० असा क्लीन स्वीप पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेऊन आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्याचे लक्ष्य असणार आहे.