पीव्ही सिंधू(फोटो-सोशल मीडिया)
BWF World Championships : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जोरदार कामगिरी करत गुरुवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू चीनची वांग झी यी हिचा २१-१९, २१-१५ असा दमदार पराभव केला आहे. या विजेसह पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
२०१९ मध्ये बासेलमध्ये जागतिक किताब जिंकणारी जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर असणारी भारतीय खेळाडू सिंधूने प्री-क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी ४८ मिनिटे घेतली. या स्पर्धेत पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती सिंधूने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम २१-१९ असा आपल्या नावावर केला. तर वांग मात्र तिच्या पुनरागमनात संघर्ष करताना दिसून आली.
सिंधूने पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये देखील १२-६ अशी मोठी आघाडी मिळवली. तिने ही आघाडी कायम ठेवली आणि दुसरा गेम २१-१५ च्या फरकाने जिंकून सामन्यात बाजी मारली. भारतीय खेळाडू सिंधुने दुसऱ्या गेममध्ये देखीलआपला फॉर्म कायम ठेवला आणि सामना जिंकून चिनी खेळाडूविरुद्धचा तिचा विक्रम ३-२ असा करून दाखवला.
क्वार्टर फायनलमध्ये इंडोनेशियन खेळाडूशी भिडणार
उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाच्या खेळाडू पुत्री कुसुमा वर्दानीसोबत होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुदिरमन कपमध्ये इंडोनेशियन खेळाडूने सिंधूचा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला होता.
भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही ६३ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाच्या तांग चुन मान आणि त्से यिंग सुएत या हाँगकाँग जोडीचा १९-२१, २१-१२, २१-१५ असा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाअ आहे.
हेही वाचा : ‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..
ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने यापूर्वी देखील आयर्लंडच्या जोशुआ मॅगी आणि मोया रायन यांना ३५ मिनिटांत २१-११, २१-१६ असे पराभूत केले होते. एका गेमने पिछाडीवर राहिल्यानंतर देखील त्यांनी खेळ उंचावत जोरदार पुनरागमन केले आणि सध्याच्या आशियाई विजेत्या जोडीला धूळ चार्ली होती. सामन्यानंतर तनिषाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “काही महिन्यांपूर्वी आमची कामगिरी चांगली झाली नाही. मला वाटते की आम्ही एकत्र, टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. आज आम्ही ज्या पद्धतीने खेळ केला त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे.”