Marathi Bhasha Din : 'मराठी भाषा गौरव दिन' अन् 'मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?
मराठी भाषा गौरव दिन कधी आणि का साजरा केला जातो?
मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी भाषेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारीला साजरा करतात. कुसुमाग्रजांनी मराठीला ज्ञानपीठ आणि जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी मराठी भाषेला साहित्यात प्रस्थापित केले. त्यांच्या या योगदानाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला.
मराठी भाषा ही भारतातील २२ अधिकृत भाषापैकी एक आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी १५ व्या क्रमांकावर तर भारतात तिसऱ्या स्थानावर आहे. ही भाषा केवळ संवादाचे माध्यमच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्मितेचा कणा आहे. यामुळे २७ फेब्रुवारी हा दिवस नव्या पिढीला मराठी भाषेच महत्व पटवून देण्यासाठी आणि तिचा वारसा जपण्यासाठी साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. यावेळी राज्याच्या शासकीय कामाकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठी मान्यता देण्यात आली. याच उद्देश शासकीय स्तरावर मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि मराठीची राजकीय अस्मिता जपणे होता. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेच्या औचित्याने राजभाषा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
तर २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याच्या गौरवासाठी आणि त्यासाठी मोलाचे योगदाने देणाऱ्या कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. यामुळे भाषेवर केवळ प्रेम न करता तिचा इतिहास आणि महत्व अचूकपणे जाणून घेणे महत्वाचे आहे.






