Mayank Agarwal : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला थेट अतिदक्षता विभागात नेण्यात आले आहे. विमान प्रवास करताना त्याची तब्येत अचानक बिघडल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याची तब्येत बिघडली आहे. विमान प्रवासादरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे त्याला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मयांकच्या तोंडाला व गळ्याला सूज
मयांक हा अगरतळा येथून प्रवास करण्यासाठी विमान प्रवास करीत होता. काही जणांच्या मते मयांक हा विमानामध्ये असताना तो पाणी प्यायला आणि त्यानंतर त्याच्या तोंडाला व गळ्याला सूज जाणवली. त्यानंतर मयांकची तब्येत बिघडली आणि त्याला थेट अगरतळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मयांक यावेळी पाणी प्यायला गेला. पण ती पाण्याची बाटली नसावी किंवा त्यामध्ये काही तरी वेगळेच मिश्रण असावे, असे आता म्हटले जात आहे.
अगरतळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल
त्यामुळे मयांकवर ही स्थिती ओढवली आहे. मयांक जेव्हा पाणी प्यायला तेव्हा त्याची तब्येत त्वरित बिघडली. त्यामुळे त्याला पुढील प्रवास करणे शक्य नव्हते. त्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची मदत केली आणि त्याला अगरतळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मयांकला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सध्याच्या घडीला त्याची तब्येत अचानक का बिघडली याचे कारण समोर आलेले नाही. त्याचबरोबर मयांक पाणी समजून जे काही प्यायला त्याचीही वैद्यकीय चाचणी होणार आहे. मयांक हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकचे नेतृत्व करीत आहे. या रणजी हंगामात मयांक हा चांगलाच चर्चेत होता. या हंगामात त्याची कामगिरीही चांगली झाली होती.
मयांक हा त्रिपुराविरुद्धचा सामना खेळण्यासाठी अगरतळाला रवाना
मयांक हा त्रिपुराविरुद्धचा सामना खेळण्यासाठी अगरतळा येथे आला होता. हा सामना २६ ते २९ जानेवारी या कालावधीत खेळवण्यात आला. या सामन्यात मयांकच्या नेतृत्वाखाली कर्नाटकच्या संघाने त्रिपुरावर विजय मिळवला होता. त्यानंतर कर्नाटका पुढील रणजी करंडक स्पर्धेतील सामना हा २ फेब्रुवारीपासून सूरत येथे खेळवण्यात येणार होता. या सामन्यासाठी मयांक हा अगरतळा येथून सूरत येथे निघाला होता. पण या प्रवासाची सुरुवात करतानाच त्याची तब्येत अचानक बिघडल्याचे आता समोर आले आहे.
मयांकच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल
मयांकच्या तब्येतीबाबत अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता तो यापुढील २ तारखेपासून सुरु होणार सामना खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. मयांकच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही तासांत मयांकचा वैद्यकीय अहवाल आल्यावरच त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो.