
Rinku Singh Back to Back Centuries in Ranji
Rinku Singh: रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये उत्तर प्रदेशचा स्टार डावखुरा फलंदाज रिंकू सिंगची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने हंगामाच्या दुसऱ्या फेरीत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. बिहारविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच, रिंकूने गोव्याविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी आणखी एक धमाकेदार शतक ठोकले. रविवारी उत्तर प्रदेशसाठी मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने १५५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. हे रिंकूच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील ११ वे शतक ठरले. यापूर्वी बिहारविरुद्धच्या सामन्यात रिंकूने आपल्या एकमेव डावात ११२ धावा केल्या होत्या. (Rinku Singh Back to Back Centuries in Ranji)
उत्तर प्रदेशचा कर्णधार आर्यन जुयालने गोव्याविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात उत्तर प्रदेशचे फलंदाज निराशाजनक ठरले. उत्तर प्रदेशने ३३ धावांत तीन विकेट्स गमावले. अभिषेक गोस्वामी पाच धावांवर लवकर बाद झाला. माधव कौशिकने ४५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार आर्यन जुयालही १४ धावा करत पव्हेलियनमध्ये परतला.तर, करण शर्मा शून्यावर बाद झाला. सात फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. एकीकडे विकेट पडण्याचे सत्र सुरु असताना दुसऱ्या टोकावर रिंकू सिंगने जबाबदारी सांभाळली. रिंकूने संयम आणि आक्रमक खेळी करत १५५ चेंडूमध्ये शानदार शतक ठोकले. यामध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
बिहारविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रिंकू सिंगनेही शानदार शतक झळकावले. त्याने आठ चौकार आणि तीन षटकारांसह ११२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्यासोबत कौशिकनेही उत्तर प्रदेशसाठी सात चौकार आणि तीन षटकारांसह १५० धावा केल्या. या दोन दमदार शतकांच्या जोरावर, उत्तर प्रदेशने २०२६-२७ रणजी ट्रॉफीच्या एलिट गट ‘अ’ च्या सामन्यात बिहारचा एक डाव आणि २६७ धावांनी पराभव केला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू सिंगने सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने २०१६ मध्ये हैदराबाद क्रिकेट संघाविरुद्ध प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रिंकूची ५० हून अधिक प्रथम-श्रेणी डावांमध्ये रिंकूची सरासरी जवळपास ६० आहे. त्याने ५५ सामन्यांमध्ये ७८ डावांत ३,९०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ११ शतके आणि २३ अर्धशतके आहेत. रिंकूची सर्वोत्तम कामगिरी नाबाद १६३ धावा आहे.