ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल मीडिया)
West Division vs. Central Division : बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा असणाऱ्या दुलीप ट्रॉफीचा थरार सध्या सुरू आहे. दुलीप ट्रॉफीचा उपांत्य सामना पश्चिम विभाग आणि मध्य विभाग यांच्यात खेळवला जात आहे. महाराष्ट्राचा कर्णधार आणि पश्चिम विभागाचा विश्वासू खेळाडू असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने मध्य विभागाविरुद्ध दमंदार कामगिरी करत शतक झळकवले आहे. या शतकाने त्याने आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.
हेही वाचा : IND vs PAK: Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला! १३ वर्षांच्या इतिहासाला कलाटणी मिळेल?
पश्चिम विभागाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. परंतु, ऋतुराज गायकवाडने मधल्या फळीत संघाची सूत्रे हाती घेतली आणि शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत, गायकवाडने १५७ चेंडूंचा सामना केला करत नाबाद १२१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १६ चौकार मारले आहेत. चहापानाच्या वेळेपर्यंत, पश्चिम विभागाने ५८ षटकांत ५ गडी गमावून २३७ धावा उभारल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या गायकवाडने आर्य देसाईसोबत ८२ धावांची मोठी भागीदारी रचली. यादरम्यान, आर्य ३९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर गायकवाडने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक टोक लावून धरले. त्याच वेळी, त्याने श्रेयस अय्यरसोबत ४५ धावांची भागीदारी देखील केली, परंतु, अय्यर २५ धावा काढून आऊट झाला. त्यानंतर शम्स मुलानी आणि तनुश कोटियन यांनी खेळ पुढे नेला. यादरम्यान गायकवाडने आपले शतक पूर्ण केले.
गायकवाडने आपल्या शतकासह, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८ वे शतक पूर्ण केले आहे. त्याच्या नावावर १४ अर्धशतके जमा आहेत. ३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, गायकवाडने ४१ पेक्षा जास्त सरासरीने २७०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. गायकवाडने अद्याप भारताकडून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच वेळी, त्याने भारताकडून ६ एकदिवसीय आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा : Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!
बेंगळुरूमधील बीसीसीआय सीओई ग्राउंड-२ वर खेळवण्यात असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात, पश्चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो चांगलाच फसला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी फक्त १० धावांवरच आपल्या दोन विकेट गमावल्या. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सांभाळला. यशस्वी जयस्वाल ४ धावा काढून माघारी परतला आणि हार्विक देसाई १ धाव काढून बाद झाला. सेंट्रल झोनकडून खलील अहमदने २ विकेट चटकावल्या. त्याच्याशिवाय हर्ष दुबेने १, सरांश जैनने १ आणि दीपक चहरने १ विकेट घेतली.