मुंबई : आयपीएल 2022 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. चेन्नईने या मोसमात फारशी चांगली कामगिरी केली नाही. संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून केवळ दोन सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा खेळाडू रॉबिन उथप्पासाठी हा सामना खास असणार आहे. या सामन्यात उथप्पा आपल्या कारकिर्दीतील 5000 आयपीएल धावा पूर्ण करू शकतो. त्याला विक्रम करण्याची संधी आहे.
सीएसकेचा अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात आयपीएलचे 5 हजार पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला अर्धशतक झळकावे लागणार आहे. तो या विक्रमापेक्षा केवळ 50 धावांनी मागे आहे. जर उथप्पाने हा विक्रम केला तर तो असं करणारा 7वा खेळाडू ठरेल. उथप्पाने आतापर्यंत खेळलेल्या 201 सामन्यात 4950 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 अर्धशतके झळकावली आहेत. उथप्पाचा आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा आहे. हैदराबादविरुद्ध तो 5 हजार पूर्ण करून विक्रम करू शकतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली यात पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत 217 सामन्यात 6469 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 शतके आणि 43 अर्धशतके केली आहेत. या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे. धवनने 201 सामन्यात 6091 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा 5766 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना पाचव्या स्थानावर आहे. रैनाने 205 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत.