टेम्बा बावुमा(फोटो-सोशल मीडिया)
SA vs ENG : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह इतिहास रचला आहे. १९९८ नंतर २७ वर्षांत प्रथमच इंग्लंडमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे.
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने क्रिकेटचा गड मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी धूळ चारत मोठी कामगिरी केली. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवत मालिका देखील जिंकली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने १९९८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती, जेव्हा त्यांनी अॅडम हॉलिओकेच्या संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. तेव्हापासून, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडमध्ये दोन मालिका गमावल्या आहेत. तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या होत्या. २०१२ आणि २०२२ ची मालिका अनिर्णित राहिली असली तरी, इंग्लंडने २०१७ मधील मालिका जिंकली होती. त्यामुळे दोन्ही अनिर्णित सामन्यांमध्ये ट्रॉफी इंग्लंडकडेच कायम राहिली. आयसीसीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार, जर ती अनिर्णित राहिली तर ट्रॉफी मागील विजेत्या संघाकडेच कायम राहत असते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडला एकदिवसीय सामन्यात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे इंग्लंडच्या अलिकडच्या फॉर्मवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून. इंग्लंडने २०२३ च्या विश्वचषकापासून आतापर्यंत ६ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या असून त्यापैकी त्यांना केवळ एकच मालिका जिंकता आली आहे. उर्वरित ५ मालिकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये या मालिकेचा देखील समावेश आहे. आता पूर्ण सदस्य संघांमध्ये, फक्त बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा विजयाचा टक्का इंग्लंडपेक्षा कमी आहे. अफगाणिस्तानचा टक्का इंग्लंडपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभव पत्करला लागला आहे. लॉर्ड्सवरील ५ धावांनी विजय हा विजयाचा दुसरा सर्वात कमी फरकाचा आहे. यापूर्वी, २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेने केपटाऊनमध्ये इंग्लंडवर १ धावेने विजय मिळवला होता. इंग्लंडने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका आपल्या ताब्यात घेतली होती.