हैदर अली(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रिटनच्या ग्रेटर मँचेस्टर पोलिसांकडून बलात्कार प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील हैदरवरील सर्व आरोप मागे घेतले गेले आहेत. तो आता ब्रिटन सोडून मायदेशी प्रतण्यास मोकळा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी, हैदर अलीला बलात्काराच्या संशयावरून ब्रिटनमध्ये ग्रेटर मँचेस्टर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ESPNcricinfo ला सांगितले की, “आम्ही अशा आरोपांकडे गांभीर्याने बघतो तसेच प्रत्येक घटनेचे सखोल मूल्यांकन करत असतो. उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या व्यापक पुनरावलोकनानंतर, प्रकरणाचा तपास सध्यासाठी बंद केला गेला आहे. जर आणखी काही माहिती समोर आली तर पुन्हा योग्य आढावा घेण्यात येणार आहे.”
२४ वर्षीय हैदर पाकिस्तान अ संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. ३ ऑगस्ट रोजी एका सामन्यादरम्यान, GMP अधिकारी बेकेनहॅम मैदानावर जाऊन त्यांनी हैदरला अटक केली. त्यानंतर GMP कडून सांगण्यात आले होते की, हैदरला २३ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये कथित गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यावेळी हैदरला जामीन मंजूर केला गेला होता आणि कथित पीडितेला अधिकाऱ्यांकडून मदत करण्यात येत होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, महिलेकडून आरोप करण्यात आले होते की, दोघे पहिल्यांदा २३ जुलै रोजी मँचेस्टरमधील एका हॉटेलमध्ये एकत्र भेटले होते, जिथे ही कथित घटना घडली होती. तसेच, तक्रार दाखल करण्यापूर्वी ते १ ऑगस्ट रोजी अॅशफोर्डमध्ये देखील भेटले होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ईएसपीएनक्रिकइन्फोला देखील दुजोरा देण्यात आला आहे की, हैदर अलीवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे की, कारवाईदरम्यान अलीला योग्य कायदेशीर मदत मिळाली आहे. त्याचे प्रतिनिधित्व फौजदारी कायद्याचे बॅरिस्टर मोईन खान यांच्याकडून करण्यात आले आहे. पीसीबीने म्हटले आहे की क्रिकेटपटूचे हक्क बोर्डाच्या खेळाडू कल्याण प्रोटोकॉल आणि आचारसंहितेनुसार संरक्षित करण्यात आले आहेत.
हैदर अलीने पाकिस्तानसाठी दोन एकदिवसीय आणि ३५ टी-२० सामने खेळलेले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ धावा देखील काढल्या आहेत. त्याच वेळी, त्याने टी-२० मध्ये ५०५ फटकावल्या आहेत. ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.