सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी(फोटो-सोशल मीडिया)
BWF World Championships 2025 : सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत च्या क्वार्टर फायनलमध्ये दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चिती करण्यात आली होती. परंतु, उपांत्य फेरीत सात्विक-चिराग जोडी पराभूत होऊन अंतिम फेरीच्या आशा मावळल्या असून कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी या ११व्या मानांकित जोडीकडून १९-२१, २१-१८, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा : ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव..
हा खेळ ६७ मिनिटांच्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली होती, पण निर्णायक गेममध्ये ते पूर्णपणे दबावाखाली आले. सात्विक आणि चिरागसाठी हे जागतिक स्पर्धेतील दुसरे कांस्य पदक ठरले. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्येही कांस्य पदक जिंकले होते. क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी मलेशियाच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांचा पराभव करून भारतासाठी पदक निश्चित केले होते.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये ९-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र चिनी जोडीने जबरदस्त पुनरागमन करत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सात्विकच्या ताकदवान स्मॅशेस आणि चिरागच्या नेटवरील खेळाने भारताने गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र चीनी खेळाडूंच्या अचूक सर्व्हिसेस आणि आक्रमक खेळासमोर भारतीय जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. लियूच्या सर्व्हिसमुळे चिराग अडचणीत आले आणि चीनने ९-० अशी आघाडी घेतली. हा गेम एकतर्फी ठरला आणि भारताचा पराभव झाला.
सामन्यानंतर चिरागने प्रतिक्रिया देताना म्हणाला की, आम्ही लय पकडू शकलो नाही. काही सोपे गुण गमावले. पण त्यांचे श्रेय त्यांना जाते. सात्विकनेही चिनी जोडीच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचे कौतुक केले. या पराभवासह भारताचा जागतिक स्पर्धेतील प्रवास संपला असला तरी सात्विक चिराग जोडीने पुन्हा एकदा भारतीय बॅडमिंटनचा झेंडा उंचावला.