अनिकेत वर्मा(फोटो-सोशल मीडिया)
MPL 2025 : मध्य प्रदेश प्रीमियर लीगचा ११ वा सामना रीवा जग्वार्स आणि भोपाळ लिओपर्ड्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अनिकेत वर्माने आपल्या शानदार खेळीने एमपीएल २०२५ स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने ओळख निर्माण करणाऱ्या अनिकेतने शानदार फलंदाजी केली आणि रीवा जग्वार्सच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. तथापि, अनिकेत शतकाच्या जवळ जाताच पावसाने खोळंबा घातला आणि सामना पुन्हा होऊ शकला नाही.
सनरायझर्स हैदराबादने या आयपीएलच्या मेगा लिलावात अनिकेतला ३० लाखांमध्ये खरेदी केली होते. आयपीएल दरम्यानच त्याने अनेक दमदार खेळी खेळून आपली छाप पाडली. आता आयपीएल संपल्यानंतर, राज्याची टी-२० लीग खेळताना त्याने सुमारे २०० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या आहेत. अनिकेतने ४६ चेंडूत ९१ धावांची नाबाद खेळी साकारली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत. शतक पूर्ण होण्यापूर्वीच पाऊस पडला आणि सामन्याची रयाची गेली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
भोपाळ लिपर्ड्सकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसापूर्वी भोपाळ लिपर्ड्सने १५.४ षटकांत ५ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. मात्र, संघाची सुरुवात फारसली चांगली झाली नाही. शिवंग कुमार एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर यश दुबे देखील ७ धावा काढून माघारी परतला. तिसरी विकेट ३७ धावांवर पडली. तर हर्ष दीक्षित १४ धावा करून बाद झाला.
तीन विकेट लवकर गमावल्यानंतर अनिकेत वर्मा आणि हिमांशू शिंदे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून संघचा डाव सावरला. यादरम्यान अनिकेत वर्माने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. त्यानंतर हिमांशू शिंदे ४६ धावांवर आऊट झाला. त्याने २८ चेंडूंचा सामना केला आणि ७ चौकार आणि १ षटकार लगावला. हिमांशू बाद झाल्यानंतर गौतम रघुवंशी देखील ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर, अर्शद खान क्रीजवर येताच पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर खेळ पुढे खेळता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
हेही वाचा : ICC मोठ्या बदलांसाठी सज्ज! ४ दिवसांचा असेल कसोटी सामना? भारत आणि ऑस्ट्रेलियासह ‘हे’ पाच देश असतील अपवाद..
अनिकेत वर्माने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल २०२५ मध्ये शानदार खेळी केल्या आहेत. त्याने १४ सामन्यांमध्ये १६६.२० च्या स्ट्राईक रेटने २३६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने अर्धशतकी खेळी देखील केली होती. आयपीएलमधील त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ७४ धावा अशी राहिली होती.