नवी दिल्ली : 5 वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएलच्या मागील हंगामात मुंबईने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकून गुणतालिकेत तळाला स्थान मिळविले होते. त्याचवेळी आयपीएल-2023 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. मुंबई इंडियन्ससाठी काहीही ठीक होत नाहीये. फलंदाज धावा करू शकत नाहीत, गोलंदाज विकेट घेऊ शकत नाहीत आणि क्षेत्ररक्षणही चांगले होत नाही.
MI खराब कामगिरीवर सुनील गावस्कर :
या मोसमात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सच्या सततच्या खराब कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवाचे कारणही गावस्कर यांनी दिले आहे.
MI ची सलामी जोडीला ठरवले दोषी :
सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विशेषत: रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीमध्ये चांगली भागीदारी न झाल्यामुळे पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला त्रास होत आहे, असे भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचे मत आहे. मुंबईला पहिल्या दोन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित आणि इशान चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले.
सलामी जोडीची मोठी भागीदारी आवश्यक :
गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, मुंबई इंडियन्सची गेल्या मोसमापासूनची सर्वात मोठी समस्या चांगली भागीदारी न करणे ही आहे. मोठी भागीदारी केल्याशिवाय मोठी धावसंख्या उभारणे अवघड असते. ते पुढे म्हणाले, मुंबई इंडियन्स या बाबतीत सातत्याने संघर्ष करत आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्या छोट्या पण उपयुक्त भागीदारीवर मुंबईने आपला डाव उभा केला पाहिजे.
MI विरुद्ध DC रंगणार थरार :
आज रात्री 7.30 वाजल्यापासून मुंबई इंडियन्स आयपीएल-2023 चा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार हा सामना. दोन्ही संघांची या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीने ते पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.