प्रो गोविंदा सीझन ३(फोटो-टीम नवराष्ट्र)
Pro Govinda Season 3 : चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अशा प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामन्याचा थरार वरळी डोम येथे ७, ८, ९ ऑगस्ट या तीन दिवसात रंगणार आहे. अंतिम स्पर्धेत राज्यभरातील १६ गोविंदा पथकं आमनेसामने उभे ठाकणार आहेत. थरांवर थराचा हा रोमहर्षक खेळ प्रेक्षकांना अनुभवता येणारा आहे. प्रो गोविंदा सीझन ३ चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल असणार आहे. ख्रिस गेलच्या उपस्थितीमुळे प्रो गोविंदा सीझन ३ आणखी ग्लोबल होणार आहे. तसेच खेळाडूंना प्रेरणा देखील मिळेल, हा खेळ केवळ आपल्या देशा पुरता मर्यादित न राहता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : Ind w vs Eng w : महिला क्रिकेट संघाचे India House मध्ये जंगी स्वागत; जेमिमा रॉड्रिग्जने गायले गीत
प्रो गोविंदा सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत.
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली की, “आजची स्पर्धात्मक बोली ही प्रो गोविंदा लीगच्या मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. एकेकाळी केवळ उत्सवाचा भाग असलेली ही परंपरा आता एका व्यावसायिक साहसी खेळात बदलली आहे, ज्यामध्ये खेळाडूंकडे प्रचंड ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य असणे आवश्यक आहे.”
तसेच सरनाईक पुढे म्हणाले की, “जागतिक क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने लीगला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित एका विश्वासार्ह क्रीडा व्यासपीठाचे स्थान अधिक मजबूत बनले आहे. तरुण गोविंदांना करिअरची संधी देऊन महाराष्ट्राचा हा वारसा देश आणि जगात पोहोचवणे, हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे.”