वनिन्दू हसरंगा(फोटो-सोशल मीडिया)
SL vs BAN : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिन्दू हसरंगा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे तो आता एकदिवसीय सामन्यात १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील सर्वात जलद खेळाडू (पुरुष आणि महिला दोन्ही) बनला आहे. त्याने शॉन पोलॉकचा विक्रम मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॉकने त्याच्या ६८ व्या एकदिवसीय सामन्यामध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याच वेळी, वनिन्दू हसरंगाने ६५ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.
गॉलमधील २७ वर्षीय क्रिकेटपटू वनिन्दू हसरंगाने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा कारनामा केला आहे. त्याने श्रीलंकेसाठी ९.५ षटकांत ६० धावा देत ३ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने १६ चेंडूत १३ धावा केल्या. २ जुलै २०१७ रोजी गॉल येथे झिम्बाब्वेविरुद्ध श्रीलंकेकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केल्यापासून, हसरंगाने ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१२ धावा केल्या आहेत आणि १०६ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
हेही वाचा : सुरेश रैना चमकणार मोठ्या पडद्यावर; लगावणार अभिनयाचे चौकार-षटकार! तमिळ चित्रपटातून करणार पदार्पण; पहा Video
बांगलादेशकडून श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव
शनिवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव केला. कर्णधार मेहदी हसन मिराजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सलामीवीर परवेझ हुसेन इमॉन आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तौहीद मिरदॉय यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने ४५.५ षटकांत २४८ धावा केल्या होत्या. इमॉनने ६९ चेंडूत ६७ धावा केल्या, तर मिरदॉयने ६९ चेंडूत ५१ धावा केल्या. हसरंगाव्यतिरिक्त, श्रीलंकेकडून असिता फर्नांडोने नऊ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले.
२४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४८.५ षटकांत फक्त २३२ धावाच करता आल्या. यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने ५६, झेनिथ लियानागेने ७८ धावा केल्या आहेत. तन्वीर इस्लामने त्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० षटकांत ३९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर तंजीम हसन सकीबने (४.५ षटकांत ३४ धावा) श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले.