टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर(फोटो-सोशल मीडिया)
Wanindu Hasaranga out of T20 World Cup : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ऐन रंगात असताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. श्रीलंका संघाचा महत्वाचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू दुशन हेमंथाची वर्णी लागली आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून या बदलाला मान्यता देण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हसरंगाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तरी दुखापत असून देखील, त्याने उल्लेखनीय लवचिकता दाखवली आणि त्याचे चार षटके पूर्ण केली. सामन्यात त्याने २५ धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट चटकावल्या होत्या. तथापि, सामन्यानंतर केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या हाताच्या स्नायूला गंभीर दुखापत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतूनच आता बाहेर पडला आहे.
हसरंगाच्या जागी ३१ वर्षीय दुशान हेमंथाला संघात स्थान देण्यात आले आहे. हेमंथाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. तो एक उपयुक्त स्पिन अष्टपैलू खेळाडू मानला जातो तसेच तो फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून संघाला संतुलन प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. श्रीलंकेचा पुढचा सामना गुरुवारी ओमानविरुद्ध आहे, जिथे हेमंथा महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आयसीसीने अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, “आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने वानिन्दु हसरंगाच्या जागी श्रीलंकेच्या संघात दुशान हेमंथाचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.”
दरम्यान, आयसीसीने न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलच्या जागी खेळाडूला देखील मान्यता देण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान ब्रेसवेलला पायाला दुखापत झाली होती. तथापि, न्यूझीलंडकडून अद्याप त्याच्या जागी खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
खेळाडूंच्या बदलीसाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची मान्यता खूप आवश्यक असते. या समितीमध्ये आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान, गौरव सक्सेना, हेमांग अमीन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक यांचा समावेश आहे.






