BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?
भारतासह जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आवडता ऑनलाईन गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) आता अडचणीत आला आहे. BGMI तयार करणारी कंपनी क्राफ्टनवर काही गंभीर आरोप करण्यात आले असून आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. खरं तर या आरोपांमुळे BGMI प्लेअर्सचं टेंशन वाढलं आहे. कंपनीवर आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी युजर्सचा डेटा एका दुसऱ्या कंपनीला विकला आहे. या आरोपांमुळे आता कंपनीने करार मोडल्याचा दावा केला जात आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे , कोणी तक्रार केली आहे, याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
एका अहवालानुसार, कंपनीवर युजर्सचा डेटा विकल्याचा आणि गोपनीयता करार मोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील रहिवासीने अकलूज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये क्राफ्टनच्या चार उच्च अधिकाऱ्यांची नावे देखील देण्यात आली आहेत. एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की क्राफ्टनने 2 ऑगस्ट 2021 रोजी सेवा करारावर स्वाक्षरी केली होती, परंतु त्या कराराचे उल्लंघन करून, कंपनीने टेलिग्राम सारख्या तृतीय पक्ष प्लॅटफॉर्मवर युजर्सचा डेटा प्रति युजर 2000 रुपये दराने विकला. या तक्रारीनंतर कंपनीविरोधात आयटी कायदा 2000 च्या कलम 72, 72अ आणि 85 तसेच आयपीसीच्या कलम 120-ब (कट रचणे) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून जर एखादी कंपनी पैशांसाठी युजर्सचा डेटा दुसऱ्या कंपनीला विकत असेल तर युजर्सनी अॅप्सवर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, त्यांनी 2023 मध्येच स्थानिक पोलिस आणि सोलापूरच्या एसपींकडे याबद्दल तक्रार केली होती, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली. 28 ऑगस्ट 2024 रोजी, माळशिरसच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना सीआरपीसीच्या कलम 156(3) अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले.
हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे, जिथे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि डॉ. नीला गोखले यांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि पुढील सुनावणी 15 एप्रिल 2025 रोजी निश्चित केली आहे. मात्र या आरोपांमुळे आता युजर्सची चिंता वाढली आहे. BGMI हा एक खूप लोकप्रिय गेम आहे. हे अँड्रॉइडवर 10 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि मोठ्या संख्येने लोक हा गेम अँड्रॉईड आणि iOS वर खेळतात. पण आता या आरोपांमुळे अॅप्सच्या युजर्सची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
या गंभीर आरोपांनंतर कंपनीने एक निवदेन जारी केलं आहे. या निवेदनात सांगितलं आहे की, “क्राफ्टनमध्ये वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही डेटा सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आम्ही कोणतीही स्पष्ट टिप्पणी देऊ.”