X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सतत काही ना काही बदल केले जात आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पैसे कमावण्यासाठी आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी मस्क सतत प्रयत्न करत आहे आणि एक्ससाठी नवीन अपडेट्स घेऊन येत आहे. आता देखील मस्कने एक मास्टर प्लॅन केला आहे. ज्यामुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे मस्कची कमाई वाढणार आहे.
मस्कने त्यांच्या सोशल मी डिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रोक AI जोडला आहे. हे AI इतर प्लॅटफॉर्म प्रमाणेच काम करते. युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्न अगदी वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्यापर्यंत ग्रोक सर्वकाही करू शकते. मात्र आता याच उत्तरांमध्ये यूजर्सना जाहिराती देखील दिसणार आहेत. एक्सची कमाई वाढावी यासाठी मस्कने हा निर्णय घेतला आहे. कारण रिपोर्टनुसार गेला काही वर्षात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची कमाई घटली आहे. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे आता ही कमाई वाढावी आणि त्याद्वारे युजर्सना चांगले अपडेट्स देता यावेत यासाठी मस्क प्रयत्न करत आहे. केवळ जाहिरातीच नाही तर ग्रोकमध्ये अनेक बदल केले जात आहेत. अलीकडेच या ग्रोकमध्ये एक नवं इमेजिन फिचर जोडण्यात आलं ज्याच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.(फोटो सौजन्य – Pinterest)
एक स्पेसेस डिस्कशनमध्ये मस्कने सांगितलं होतं की, ग्रोकने दिलेल्या उत्तर आणि सल्ल्यांसोबतच आता जाहिराती देखील दिसणार आहेत. ज्यामुळे AI चॅटबॉटद्वारे कंपनी कमाई करू शकते. आतापर्यंत xAI केवळ चॅटबॉटला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र आता या चॅटबोटच्या कमाईकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे. मस्कने Grok Imagine लाँच करण्याची घोषणा देखील केली होती, जे AI च्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल सध्या अमेरिकेत फ्रीमध्ये उपलब्ध आहे आणि Grok अॅपमध्ये जोडण्यात आले आहे. जे ऐप स्टोर आणि गूगल प्लेद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.
मस्कने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोक चालवणाऱ्या महागड्या GPU चा खर्च भागवण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. ते म्हणाले की यूजरच्या विशिष्ट प्रश्नाच्या उत्तरात जाहिराती या सल्ले म्हणून देखील येऊ शकतात. तथापि, त्यांनी संपूर्ण कमाई योजनेबद्दल जास्त माहिती दिली नाही. याशिवाय, X प्लॅटफॉर्मवर जाहिरातींना अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्यित करण्यासाठी xAI च्या तंत्रज्ञानासह अल्गोरिदम देखील ऑप्टिमाइझ केले जातील.
रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, मस्कने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ऑक्टोबर 2022 मध्ये मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून आणि ते खाजगी घेतल्यापासून कंपनीच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आता घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीचे उत्पन्न वाढू शकते.