Elon Musk च्या Grok चं वाढलं टेंशन, हिटलरची स्तुती करणं पडलं महागात! तुर्कीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
एलन मस्क आणि त्याने लाँच केलेले आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबाट ग्रोक दोन्ही नेहमीच चर्चेत असतात. याचं कारण म्हणजेच मस्क ग्रोक युजर्ससाठी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असतो. इतर चॅटबोट्सप्रमाणे ग्रोक देखील लोकप्रिय आहे. पण आता हेच लोकप्रिय ग्रोक अडचणीत आले आहे. कारण तुर्कीच्या न्यायालयाने ग्रोकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हिटलरची स्तुती आणि राष्ट्रपतींचा अपमान या कंटेटमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता एलन मस्क आणि ग्रोकच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तुर्कीमधील न्यायालयाने एलन मस्कच्या मालकीच्या ग्रोकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रोकवर राष्ट्रपती आणि इतरांबद्दल अपमानास्पद मजकूर पसरवल्याचा आरोप आहे, याच आरोपांचा विचार करून तुर्कीच्या न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. ए हॅबर न्यूज चॅनलने वृत्त दिले आहे की ग्रोकने तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान, त्यांच्या दिवंगत आई आणि सेलिब्रिटींविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आधुनिक तुर्कीचे संस्थापक मुस्तफा केमाल अतातुर्क यांच्याविरुद्धही आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या आहेत. ही गंभीर असून आता तुर्कीने ग्रोकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ग्रोकची औपचारिक चौकशीची घोषणा केली आणि न्यायालयाने ग्रोकचा काही कंटेंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रोकवर सेन्सॉरशिप लादणारा तुर्की हा पहिला देश बनला आहे, असे इस्तंबूल बिल्गी विद्यापीठातील सायबर कायदा तज्ञ यामन अकदेनिझ यांनी नमूद केले.
खरं तर, मस्क यांनी शुक्रवारी सांगितले होते की ग्रोकमध्ये खूप सुधारणा झाली आहे आणि युजर्सनी हा फरक पाहिला पाहिजे. तेव्हापासून, ग्रोकने अनेक यहूदी-विरोधी पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने अॅडॉल्फ हिटलरची प्रशंसा केली आहे. ग्रोकच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ग्रोकवर तुर्कीने केलेल्या कारवाईने जागतिक लक्ष वेधले आहे, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि एआय प्रशासनावर वादविवाद सुरू झाला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, चॅटबॉटने दक्षिण आफ्रिकेतील वांशिक राजकारण आणि श्वेत नरसंहार या विषयावर चर्चा केली आणि त्यांना विविध प्रश्न विचारले गेले, ज्यापैकी बहुतेक प्रश्नांचा देशाशी काहीही संबंध नव्हता. एलन मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीने बुधवारी सांगितले की ते ग्रोकने केलेल्या अनुचित पोस्ट काढून टाकत आहेत.
एलोन मस्क यांनी xAI च्या नवीनतम मॉडेल Grok 4 चे अनावरण केले. नवीन ग्रोक 4 प्रतिमा विश्लेषण करू शकते आणि प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. लाईव्हस्ट्रीममध्ये मस्क म्हणाले की ग्रोक 4 प्रत्येक विषयात पीएचडी धारकांपेक्षा चांगले आहे. कधीकधी त्यात सामान्य ज्ञानाचा अभाव असू शकतो. xAI ने Grok 4 आणि Grok 4 Heavy चे मल्टी-एजंट व्हर्जन लाँच केले, ज्याची कार्यक्षमता चांगली आहे.