Meta AI ने वाचवले जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचे प्राण; पोलिसांना दिला अलर्ट (फोटो सौजन्य - pinterest)
मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जीवन संपवण्यासाठी निघालेल्या एका 21 वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. लखनौमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी Meta AI ने पोलिसांना वेळेवर अलर्ट पाठवला ज्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला आहे. या कामगिरीमुळे Meta AI चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाल असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट करत Meta AI चं कौतुक केलं आहे. Meta AI आता केवळ माहिती शोधणं किंवा गप्पा मारणं एवढंच काम करत नाही, तर तो एखाद्या व्यक्तिचा जीव देखील वाचवू शकतो.
हेदेखील वाचा- Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार
लखनौमध्ये Meta AI ने एका प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Meta AI च्या कमाल फीचरमुळे एका मुलीचे प्राण वाचले आहेत. 21 वर्षीय मुलगी जेव्हा तिचं जीवन संपण्यासाठी टोकाचं पाऊल उचलत होती, त्यावेळी मुलीच्या हेतूबद्दल AI ने स्थानिक प्राधिकरणाला वेळीच सावध केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. पोलिसांचं हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालं असून मुलीचे प्राण वाचले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, Meta AI सिस्टमने जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला व्हिडिओ फ्लॅग केला. या व्हिडिओमध्ये 21 वर्षीय मुलगी गळ्यात फास बांधलेली दिसत आहे. यासोबतच या मुलीने गळ्यात फास घेऊन आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
हेदेखील वाचा- अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम
वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लखनौमधील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सोशल मीडिया सेंटरचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लखनऊमधील पोलीस महासंचालकांच्या सोशल मीडिया सेंटरने तातडीने कारवाई केली. सतर्कतेनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली. मुलीच्या लोकेशनची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले. महिला अधिकाऱ्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अशाप्रकारे तातडीने समुपदेशन करून मुलीचे प्राण वाचले.
आत्महत्या करायला निघालेल्या या मुलीचे चार महिन्यांपूर्वी आर्य समाज मंदिरात लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. काही वेळाने मुलीचा पती तिला सोडून गेला. ज्याचा परिणाम मुलीच्या मानसिक स्थितीवर झाला. तिचा नवरा गेल्यानंतर तिला एकटं आणि नैराश्य वाटू लागलं. या सर्व प्रकारामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं.
अशा प्रकरणांमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची मदत घेतली जाऊ शकते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी मानसिक तणावातून जात असल्यास, मदत पुरवली जाऊ शकते. मदतीसाठी, तुम्ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या 1800-599-0019 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.