भारतात अनेक प्राचीन मंदिर आणि त्यांच्या प्रचलित कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा अद्वितीय इतिहास ऐकून अनेकांना इथे जाण्याची इच्छा होते. देवभूमी उत्तराखंडमध्ये तुम्हाला अनेक आश्चर्यकारक कथा आणि चमत्कारी मंदिरे पाहायला मिळतील. सुंदर पर्वतांच्या मधोमध वसलेल्या या मंदिरांमध्ये एक मंदिर देखील आहे जे वर्षभर बंद असते. या मंदिराची खासियत म्हणजे, हे मंदिर वर्षातून फक्त एक दिवस, विशेष प्रसंगी, फक्त 12 तासांसाठी उघडले जाते. वर्षभर बंद असलेल्या या मंदिराविषयी जाणून घ्यायचे असेल आणि त्याला भेट द्यायची असेल, तर या रोमांचक प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घ्या.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित बंशी नारायण मंदिर हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर वर्षभर बंद असते, त्यामुळे भाविकांना नियमित पूजा करता येत नाही. मात्र, मंदिराचे दरवाजे विशिष्ट दिवशी केवळ 12 तासांसाठीच उघडले जातात. या विशेष दिवशी, मंदिर उघडताच, येथे प्रार्थना करणाऱ्या आणि भगवान बंशी नारायण यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
चमोली येथील बंशी नारायण मंदिराचे दरवाजे केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच भाविकांसाठी उघडले जातात. या दिवशी सूर्यप्रकाश असेपर्यंत मंदिर खुले असते. सूर्यास्त होताच मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद होतात. सकाळपासूनच दूर-दूरवरून भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येथे येऊ लागतात आणि दरवाजे कधी उघडणार याची आतुरतेने वाट पाहत बसतात.
हेदेखील वाचा – दिल्लीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाघर जिथे ‘Stree 2’ चित्रपटाची मिळतील सर्वात स्वस्त तिकीट
चमोली येथील बंशी नारायण मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू त्यांच्या वामन अवतारातून मुक्त झाल्यानंतर प्रथम या ठिकाणी आले. त्यानंतर देव ऋषी नारद मुनींनी येथे भगवान नारायणाची पूजा केली. त्यामुळे केवळ एक दिवसच देवाच्या दर्शनासाठी या मंदिराचे दरवाजे उघडले जातात, अशी श्रद्धा आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी हे मंदिर उघडण्याची कथा राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडलेली आहे. कथेनुसार, राजा बळीने भगवान विष्णूला आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली होती, जी परमेश्वराने मान्य केली आणि तो राजा बळीसोबत पाताळात गेला. जेव्हा देवी लक्ष्मीला अनेक दिवस भगवान विष्णू कुठेच सापडले नाहीत, तेव्हा नारदजींच्या सूचनेवरून तिने राजा बळीला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षासूत्र बांधून भगवान विष्णूंना मुक्त करण्याची विनंती केली. यानंतर राजा बळीने भगवान विष्णू आंणि देवी लक्ष्मीची याच ठिकाणी भेट घालून दिली.
असे मानले जाते की, नंतर पांडवांनी या ठिकाणी मंदिर बांधले. रक्षाबंधांच्या दिवशी येथे येणाऱ्या महिला भगवान बंशी नारायण यांना राखी बांधतात. या मंदिराच्या आजूबाजूला दुर्मिळ प्रजातीची फुले आणि झाडेही पाहायला मिळतात. या जागेचे दृश्यदेखील मोहून टाकणारे आहे.