एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे नवीन स्पॉट बनले आहे. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्ह्यांची संख्या काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता या घटनांमध्ये आणखीन एका घटनेचा समावेश झाला आहे. पुण्यात एका महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर तिची अवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक चर्चेला विषय बनला आहे.
झाले असे की, बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका महिलेला ओव्हरटेक करत तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. संबंधित महिला एक डिजिटल कंटेंट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलेही होती. तिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महिलेने एक व्हिडीओ शुट करत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील तिची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
धक्कादायक घटनेला बळी पडल्या महिलेचे नाव जेरीलन डिसिल्वा असे आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडीवरून आपल्या दोन मुलांसह चालली होती. यावेळी अचानक काहींनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे, हे बघताच महिलेने त्या गाडीला बाजूने जाण्यास जागा दिली. मात्र यानंतर जे झाले त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. गाडीने पुढे जाण्याऐवजी त्यातील चालक बाहेर आला आणि त्याने अचानक डिसिल्वा यांच्या चेहऱ्यावर जोरदार बुक्का मारला. महिलेला काही कळेल याआधीच तिच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.
हेदेखील वाचा – वारीची पुण्याई! आषाढी वारीवरून घरी आलेल्या आईसाठी मुलाने घातल्या फुलांच्या पायघड्या, Video Viral
जेरीलन डिसिल्वा यांनी सांगितले की, हल्ला करणारा व्यक्ती हा वृद्ध होता आणि तो वेगाने गाडी चालवत होता. महिलेने सोशल मीडियावर या घटनेनंतरचा व्हिडिओ पोस्ट करत दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डिसिल्वा यांच्यावर बाणेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोराने 2 किलोमीटरपासून आपला पाठलाग केल्याचेही महिलेने म्हटले आहे.
दरम्यान आता या संपूर्ण घटनेनंतर पुणे पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर आता पुणे दिवसाही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये सदर घटनेची माहिती दिलेली आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत सदर घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे.