मूर्ती लहान पण कीर्ती महान! 'या' 5 वर्षाच्या मुलाने 312 किमी वेगाने चालवली लॅम्बोर्गिनी
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण आपण कित्येक वेळा ऐकत असतो. आपल्या आजूबाजूच्या लहानग्या व्यक्तीने एखादे मोठे कार्य केले की अनेक जण हमखास या म्हणीचा उपयोग करतात. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात जिथे लहान मुलं जे मोठ्यानं जमणार नाही अशी कामे करतात. यावर अनेक मीमर मंडळी सुद्धा रिऍक्ट होत असते.
आपल्याकडे वाहतुकीचे नियम किती कडक आहे हे सांगायची गरज नाही. आपण कित्येक म्हणतो की गाडी चालवणं लहान पोरांचा खेळ नाही पण जर एका 5 वर्षाच्या पोराने जबरदस्त वेगात लॅम्बोर्गिनी चालवली तर?
तुर्कीतील एका पाच वर्षाच्या मुलाने आपल्या स्टंटनंतर जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे. झैन सोफुओग्लू नावाच्या एका लहान मुलाने ताशी 312 किमी वेगाने नवीन लॅम्बोर्गिनी रेव्हुल्टो चालवली आहे. हा असा वेग आहे, जो मिळवण्यासाठी अनेक रायडर्स आपले संपूर्ण आयुष्य खर्च करतात.
झैन सोफुओग्लूच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये झैन रेस सूटमध्ये आहे आणि प्लग-इन हायब्रिड सुपरकारच्या पॅसेंजर सीटवर मुलाचे वडील केनान सोफुओग्लू (माजी मोटरसायकल रेसर) आहेत.
आता तुम्ही म्हणाल त्याचे पाय तरी पोहचेल का कारच्या ब्रेकपर्यंत. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो, पाच वर्षांचा जैन चाईल्ड सीटवर बसला आहे जेणेकरून त्याचे पाय एक्सलेटर आणि ब्रेकपर्यंत पोहचू शकतात.
व्हिडिओ झाला व्हायरल
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, 5 वर्षीय झैन रिकाम्या धावपट्टीवर 0 ते 312 किमी प्रतितास वेगाने लॅम्बोर्गिनी चालवताना दिसत आहे. अशा प्रकारे ताशी 312 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी चालवणारा झैन हा जगातील पहिलाच मुलगा ठरला आहे.
पाच वर्षांच्या झैनने असा विक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2023 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी तो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यादरम्यान झैन याने Ferrari SF90 Stradale चालवली होती. वडिलांच्या मदतीने आता झैन मोटरसायकल आणि कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आहे.