4 दशलक्ष हेक्टरवरील जंगल नष्ट, लाखो प्राणी, कुटुंबं बेघर; का धुसतेय अमेरिका? वाचा सविस्तर
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजिलेसच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. हजारो घरं, हजारो एकर जंगलं बेचिराख झाली असून हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. दरम्यान इतक्या मोठ्या आणि वारंवार आगीच्या घटना अमेरिका खंडांमध्येच का घडतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वसुंधरेचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अमेझॉनचं जंगल आणि दक्षिण अमेरिका सध्या भयंकर आगीच्या ज्वाळांनी वेढली आहे. दोन दशकांतील सर्वात भयंकर जंगलातील आगींचा सामना दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेला करावा लागत आहे. २०२४ च्या वाइल्डफायर सीझनमध्ये लागलेल्या आगींची संख्या आधीच्या आगीच्या घटनांपेक्षा कितीतरी भयंकर कितीतरी पटीने अधिक आहेत. ब्राझीलच्या INPE (National Institute for Space Research) या संस्थेच्या उपग्रह डेटामध्ये दक्षिण अमेरिकेतील १३ देशांमध्ये एकूण ३,४६,११२ हॉटस्पॉट्स आढळल्याचं समोर आलं आहे. जो २००७ च्या ३,४५,३२२ आगींच्या घटनांपेक्षा अधिक आहे.
२०२४ च्या वर्षीच्या सुरुवातीपासून अमेझॉनच्या वर्षावनांमध्ये (Amazon Rain Forest) मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडल्या होत्या. ज्यामुळे ब्राझील, पेरू, बोलव्हिया, कोलंबिया आणि इतर शेजारील देशांमध्ये लाखो हेक्टर जमिनीवरील जंगलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. सध्या दक्षिण अमेरिकेत जंगलांमध्ये आगींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, वातावरण आणि हवामानावर होत आहे.
कॅलफायरच्या (कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन, राज्य आग नियंत्रक कंपनी) माहितीनुसार, 2021 मध्ये कॅलिफोर्नियाला भयंकर आगीचा सामना करावा लागला. फक्त एका आगीच्या घटनेत 960,000 एकर (3,885 चौ. किमी) पेक्षा जास्त जंगल जळून खाक झालं. तर 2022 मध्ये राज्यातील जंगलांमध्ये सौन्य आगीच्या घटना घडल्या होत्या. तरीही 2.3 दशलक्ष एकर (9,307 चौरस किमी) च्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 300,000 एकर (1,214 चौरस किमी) पेक्षा जास्त जंगल बेचिराख झालं. ऑगस्ट 2023 चा महिना सरासरीपेक्षा थंड आणि दमट होता. तरीही सव्वा लाख एकर जमीन जळून खाक झाली होती. त्याच चार जणांचा मृत्यूही झाला होता.
दक्षिण अमेरिकेत लागलेल्या जंगलातील आगींच्या घटनेत सर्वाधिक प्रभावित झालेला देश म्हणजे ब्राझील. या खंडातील सर्व आगींपैकी जवळपास ६० टक्के आगीच्या घटना एकट्या ब्राझीलमध्ये घडतात. ब्राझीलमधील Mapbiomas या एका NGO च्या रिपोर्टनुसार, जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ११ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील जंगलं आगीमुळे नष्ट झाली आहेत. जे क्षेत्र उत्तराखंडच्या आकाराच्या जवळजवळ दुप्पट आहे. या आगीची ऍमेझॉनच्या जंगलासोबतच सेराडो (जगातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले सवाना) आणि पतानल वेटलँड्स या परिसंस्थानाही झळ बसली आहे.
ब्राझीलनंतर बोलव्हियामध्ये आगींच्या घटनांमुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. INPE च्या आकडेवारीनुसार, १३ सप्टेंबरपर्यंत बोलव्हियातील ३.८ दशलक्ष हेक्टर जंगल आणि गवताळ प्रदेश नष्ट झाले आहेत. तर पेरू, अर्जेंटिना, आणि पराग्वे या देशांमधील जंगलांनाही मोठा परिणाम दिसून येत आहे.
जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतं असून दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांच्या आकाशावर विषारी ढग पसरले आहेत. Live Science च्या अहवालानुसार, या धुरामुळे १० दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विषारी ढगांचं आच्छादन निर्माण झालं आहे. तब्बल अमेरिकेच्या आकारापेक्षा मोठ्या भूभागावर ढग साचले असून जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
उरुग्वेच्या हवामान तज्ज्ञ नतालिया गिल यांनी सांगितलं की, दक्षिण ब्राझील, उत्तर अर्जेंटिना, बोलव्हिया, पराग्वे, आणि उत्तर-पूर्व उरुग्वेतील शहरांमधील हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत आहे. काही शहरांमध्ये धुरामुळे दृश्यमानता कमी झाली असून ब्लॅक रेन म्हणजेच काळा पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अर्जेंटिनातील किमान ११ प्रांतांमध्ये अशाच प्रकारच्या घटनांची अलिकडे नोंद झाली आहे.
धुरामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. INPE च्या संशोधक कार्ला लोंगो यांच्या मते, या धुरामुळे श्वसनाचे त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. या आजारांमुळे हजारो अकाली मृत्यू होऊ शकतात. एका २०२३ च्या अभ्यासानुसार, वाइल्डफायरच्या धुरामुळे दरवर्षी दक्षिण अमेरिकेत अंदाजे १२,००० अकाली मृत्यू होतात.
ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान दक्षिण अमेरिकेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगी सामना करावा लागतो. हा कालखंड वाइल्डफायर सीझन म्हणून ओळखला जातो. मात्र, आता परिस्थिती अधिकच गंभीर आहे. अमेरिका खंडातील ऐतिहासिक दुष्काळामुळे आगींचं प्रमाण अधिक वाढलं आहे. विशेषतः ब्राझील, पेरू, आणि बोलव्हियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. ब्राझीलमधील ५९ टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आहे. तर ऍमेझॉन खोऱ्यातील नद्यांच्या प्रवाहात मोठी घड झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
अलिकडच्या काळात अमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे वाइल्डफायर्सच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग लागल्यानंतर कोणताही अडथळा निर्माण होत नाही त्यामुळे आग मोठ्या भूभागावर खूप कमी वेळत पसरते. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील स्थानिक बदलांना बेसुमार जंगलतोडच जबाबदार आहे, ज्यामुळे तीव्र दुष्काळाचं संकट निर्माण झालं आहे आणि आगीच्या घटना वाढण्यासाठी पोषक वातावरण असतं, असं वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे.
या प्रदेशात ऑक्टोबरमध्ये दरवर्षी पाऊस पडतो, पण आता त्याची शाश्वती राहिली नाही. ऍमेझॉन एन्व्हायर्नमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका एॅन अलेंकार यांनी Grist ला माहिती देताना सांगितलं की, पाऊस पडेल की नाही, हे सांगता येत नाही. दुष्काळ, जंगलातील आगी आणि पूर यांसारख्या तीव्र हवामान घटनांचे प्रमाण पुढील काही वर्षांत अधिकच वाढेल, कारण जागतिक तापमानवाढीचे प्रमाण सुरूच राहील, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.