लेखिका तस्लीमा नसरीन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरुच आहेत. यावर भारत-अमेरिका, तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे हल्ले थांबवण्याबाबत आपले मत मांडले आहे. दरम्यान बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी देखील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तीव्र टीका केली आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या वाढत्या छळाविरोधात आवाज उठवला.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतरही सुरु असलेल्या हिंदूवरील हल्ल्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. नसरीन यांनी 1971 च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामाची आठवण करून दिली आणि भारताच्या योगदानाची प्रशंसा करत सध्याच्या परिस्थितीवर खंत व्यक्त केली. तस्लीमा नसरीन यांनीम्हटचले की, “1971 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात बांग्लादेशाला वाचवण्यासाठी भारताने 17,000 सैनिक गमावले. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना शस्त्रास्त्र आणि प्रशिक्षण दिले, पण आज त्यांनाच शत्रू ठरवले जात आहे. तर दुसरीकडे, 30 लाख लोकांची हत्या करणारा आणि 2 लाख महिलांचा छळ करणारा पाकिस्तान आजचा मित्र बनला आहे.”
अल्पसंख्यांवर वाढते अत्याचार
शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांग्लादेशात अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेनंतर हिंसा उफाळून आला. बांग्लादेशी ध्वजाच्या कथित अपमानाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे.
भारत, यूके आणि इतर अनेक देशांनी बांग्लादेशातील या घटनांची कठोर शब्दांत निंदा केली आहे. भारतामध्ये निर्वासित जीवन जगत असलेल्या शेख हसीना यांनी देखील युनूस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी या सरकारला “नरसंहारक” संबोधून अल्पसंख्यांकविरोधी धोरणांचा निषेध केला आहे.
अल्पसंख्यांकांच्या समर्थनार्थ प्रदर्शन
या अत्याचारांविरोधात पुढील आठवड्यात बांग्लादेश दूतावासाबाहेर मोठा निषेध मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. भारतातील 200 हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिक समाजाच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, या मोर्चाचा उद्देश बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या छळाविरोधात जगाचे लक्ष वेधणे आहे.
ISKCON वर पुन्हा हल्ला
दोन दिवसांपूर्वी ढाका येथील ISKCON नमहट्टा मंदिरावर हल्ला करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि देवतांच्या मूर्त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. कोलकात्यातील ISKCON चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेची पुष्टी केली. बांग्लादेशातील सध्याच्या परिस्थितीने शेजारील देशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.