Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; बिरगंजमधील हिंसक निदर्शनांनंतर रक्सौल सीमा सील
Birgunj Violent Protests: नेपाळमध्ये २०२५ मध्ये झालेल्या जनरेशन झेडच्या आंदोलनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. नेपाळमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुकादेखील होणार आहेत. पण अशातच नेपाळच्या परसा आणि धनुषा जिल्ह्यांमध्ये धार्मिक तणावामुळे परिस्थिती अलिकडेच चिघळली आहे. परसा जिल्ह्यातील बिरगंज येथे एका मशिदीची तोडफोड आणि पवित्र ग्रंथ जाळल्यानंतर निदर्शने सुरू झाली. निदर्शने हळूहळू वाढत गेली आणि सोशल मीडियावर धार्मिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तणाव वाढला.
परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी नेपाळच्या अंतरिम सरकारने बिरगंजमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. भारत-नेपाळ सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे आणि मैत्री पुलासह सर्व सीमा ओलांडणे थांबवण्यात आले आहे. फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी आहे.
सीमा सुरक्षा दलाने (एसएसबी) अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे आणि सर्व पर्यटकांवर कडक तपासणी केली जात आहे. बिरगंजमध्ये दगडफेकीनंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले. सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीमेवर श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ बिरगंजमध्येच नाही तर सहदेवा, महादेवा, पंतोका, सिवान टोला आणि मुशाहरवा यासारख्या इतर सीमावर्ती भागातही गस्त वाढवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नेपाळच्या धनुषा जिल्ह्यातील कमला नगरपालिकेत मशिदीची तोडफोड करून कुराण जाळल्याच्या घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायाने आंदोलन केले, मात्र हे आंदोलन पुढे हिंसक वळण घेतल्याने परिस्थिती चिघळली. दरम्यान, या प्रकाराचा हिंदू संघटनांनीही निषेध केल्याने परिसरातील तणाव आणखी वाढला.
घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.
दरम्यान, बिरगंजमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा परिणाम नेपाळमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांवरही झाला आहे. असुरक्षिततेच्या भीतीमुळे अनेक भारतीय कामगारांनी आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक राकेश यांनी सांगितले की, बिरगंजमधील बाजारपेठा व दुकाने पूर्णतः बंद असून सध्याच्या परिस्थितीत तेथे राहण्यात काही अर्थ नाही. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच आपण पुन्हा कामावर परतू.
कर्फ्यू कालावधीत सुरक्षा दलांना कडक कारवाई करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले असून, नागरिकांना फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कर्फ्यू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, मानवाधिकार संघटना तसेच राजनैतिक मिशनशी संबंधित वाहने यांना कर्फ्यू दरम्यान सूट देण्यात आली आहे. ही सर्व वाहने सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली प्रवास करू शकतात. याशिवाय, वैध हवाई तिकिटे असलेल्या हवाई प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.दरम्यान, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.






