'मी लवकरच परत येईन; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यानंतर देशात हिंसाचार सुरुच होता. यामुळे हसीना यांनी (17 फेब्रुवारी) एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्त्वात असलेल्या अंतरिम सरकारवर तीव्र टिका केली आहे. त्यांनी म्हटले की, त्या बांगलादेशात लवकरच परत येतील आणि बांगलादेशातील पीडित कुटूंबीयांना न्याय मिळवून देतील.
तसेच, “मी प्रत्येक पीडित कुटुंबाला मदत करेन आणि त्यांच्या हत्याऱ्यांना कायद्याचा सामना करायला लावेन. मला वाटते की अल्लाहने मला याच उद्देशासाठी जिवंत ठेवले आहे.” असे त्यांनी म्हटले.
आंदोलनातील लोकांचा मृत्यू पोलिसांमुळे झालेला नाही
शेख हसीना पदावर असताना जुलै-ऑगस्चमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन झाले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. यावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, आंदोलनातील अनेक लोक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेले नाहीत. हसीना यांनी दावा केला आहे की, जर आता पोस्टमार्टम केले गेले, तर हे सिद्ध होईल की मृत्यू पोलिसांच्या गोळीबारामुळे नव्हता.
त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बाजू घेतली आणि म्हटले की, “पोलिसांनी फार संयम दाखवला. त्यांच्यावर हल्ला झाल्यावरच त्यांनी कारवाई केली.” अबू सईद प्रकरणाचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, पोलिसांवर हल्ला झाल्यावरच त्यांनी कृती केली. हसीना यांनी पोलिसांच्या संयमाचे समर्थन करत, पोलिसांच्या हत्यांना एक पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले.
मोहम्मद युनूस सरकारवर आरोप
शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्त्वात असलेले अंतरिम सरकार देश चालविण्यास अयोग्य असल्याचे म्हटले. त्यांनी आरोप केला की, “यूनुस यांनी स्वतः मान्य केले आहे की त्यांना देश चालवता येत नाही. तरीही ते सत्तेवर आहेत. सरकारी अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले त्यांच्या अक्षमतेचे उदाहरण आहे.”
त्यांनी युनुस यांच्यावर ढाका येथील पूर्वजांच्या घराला जाळण्याचा कट रचल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “बंगबंधूचे घर जाळण्यात आले. मी ते घर लोकांना देऊ केले होते, पण तेही नष्ट करण्यात आले. हे त्यांचे षडयंत्र होते.”
बांगलादेशला दहशतवादी राष्ट्र बनवले
हसीना यांनी, यूनुस सरकारने बांगलादेशला दहशतवादी राज्यात बदलले आणि मानवाधिकारांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. त्यांना एक दिवस कायद्याचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांनी सरकारच्या आर्थिक आणि सुरक्षाविषयक धोरणांवरही तीव्र टीका केली. बांगलादेश अर्थव्यवस्था अडचणीत आहे, कायदा-सुव्यवस्था ढासळत आहे आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे, तसेच सहा महिन्यांपासून हिंसाचार सुरुच असल्याचे त्यांनी म्हटले.