JD Vance India Visit: अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि पंतप्रधान मोदी यांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस सध्या चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांनी त्यांच्या चर्चेत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचे स्वागत केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये देशासाठी परस्पर हिताच्या विवध प्रादेशिक आणि जागतिक विचारांची देवाण-घेवाण झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह सुमारे 60 देशांवर टॅरिफ लागू केले आहे. सध्या या निर्णयावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाच्या काही आठवड्यानंतर जेडी वेंस यांचा हा पहिला भारत दौरा असून अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापर करारासाठी वाटाघाटी करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे दोन्ही देशांतील बाजारपेठ आणि शुल्कासंबंधीच्या विवध समस्या सोडवल्या जातील. 2023-24 मध्ये भारत आणि अमेरिकेत 4.99 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापर भागीदार बनला आहे.
आता उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि त्यांचे कुटुंब दिल्ली दौऱ्यावर असून या नंतर ते जयपूर आणि आग्राला भेट देतील. या भेटीमुळे भारत आणि अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात दोन्ही देशांमध्ये व्यापर आणि धोरणात्मक भागीदारीमध्ये वाढ होईल.