'भारत शत्रू नाही, दहशतवाद... ' Operation Sindoor नंतर मलालाचा जगाला 'असा' संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Operation Sindoor : पाकिस्तानात जन्मलेली नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य करत शांततेचा आणि मानवतेचा संदेश दिला आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये वातावरण चिघळले असताना मलालाने संयमाचे आवाहन करत म्हटले की, “आपण एकमेकांचे शत्रू नाही, आपला खरा शत्रू दहशतवाद आणि हिंसाचार आहे.”
मलाला युसूफझाई हिने एका मुलाखतीत म्हटले, “पाकिस्तान, भारत आणि अन्य शेजारी देशांनी एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे. आपल्याला एकमेकांशी संघर्ष करून काहीही मिळणार नाही. आपल्याला अशा शक्तींशी लढायला हवे ज्या समाजात द्वेष आणि हिंसाचार पसरवतात.” तिने स्पष्ट केले की भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांचे, विशेषतः मुलांचे भवितव्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत राजकीय नेतृत्वाने शहाणपणाने निर्णय घेणे गरजेचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’वर संपूर्ण जगाचा भारताला पाठिंबा; फक्त ‘हे’ 3 मुस्लिम देश पाकिस्तानला करत आहेत युद्धासाठी प्रवृत्त
मलालाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांची आठवण करून दिली. ती म्हणाली, “मी स्वतः दहशतवादाची बळी ठरले आहे. 2012 मध्ये, तालिबानने फक्त शिक्षणासाठी आवाज उठवल्यामुळे माझ्यावर प्राणघातक हल्ला केला.” हा अनुभव सांगताना मलालाने असेही नमूद केले की, “कोणताही माणूस जन्मतः अतिरेकी नसतो. समाज, परिस्थिती आणि चुकीची विचारसरणी त्याला त्या मार्गावर नेतात.” म्हणूनच, शिक्षण, संवाद आणि संधीच्या माध्यमातून दहशतवादी विचारसरणीला रोखले पाहिजे, असे ती म्हणाली.
मलालाने तिचा संदेश फक्त मुलाखतीपुरता मर्यादित ठेवला नाही. तिने ट्विटरवरूनही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. तिच्या पोस्टमध्ये ती म्हणाली, “द्वेष आणि हिंसाचार हे आपले समान शत्रू आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी तणाव कमी करावा, नागरिकांचे संरक्षण करावे आणि फुटीरतावादी शक्तींविरोधात एकत्र यावे.” तिने दोन्ही देशांतील निष्पाप नागरिकांचे, विशेषतः मुलांचे संरक्षण करण्याचे आवाहन करत त्यांच्यासाठी सहवेदना व्यक्त केली. तिच्या मते, शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनयिक मार्गच एकमेव प्रभावी उपाय आहे.
फक्त भारत-पाकिस्तानच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायानेही हस्तक्षेप करून शांततेला चालना द्यावी, असेही मलालाचे मत आहे. तिच्या मते, “शांतता, सहकार्य आणि संवाद हेच या क्षेत्रातील स्थिरतेचे आणि समृद्धीचे खरे स्तंभ आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे जागतिक स्तरावर संभ्रम; आरोप प्रत्यारोपात कोण बरोबर कोण चूक?
मलालाचे वक्तव्य राजकीय नेत्यांसाठी जागे करणारे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, एका दहशतवादग्रस्त मुलीने शांततेचा आवाज उठवणे ही मानवतेसाठी दिलासा देणारी बाब आहे. दहशतवाद, हिंसाचार आणि फुटीरतेविरोधात एकत्र लढण्याची गरज अधोरेखित करत, मलालाने स्पष्ट सांगितले. “भारत शत्रू नाही. खरा शत्रू दहशतवाद आहे.”