फोटो सौजन्य: सोशल मीडिया
न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. स्वामीनारायण मंदिरात ही तोडफोड झाली असून तोडफोडीच्या घटनेनंतर भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाने सांगितले आहे की, या ही घटना अस्वीकार्य आहे. या घटनेत सामील असलेल्या गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. यासाठी हे प्रकरण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील मेलविल येथे असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या BAPS स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीबाबत भारतीय मिशनने माहिती दिली. हे अस्वीकार्य आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास समुदायाच्या संपर्कात आहे. न्यूयॉर्कमधील BAPS हिंदू मंदिरावरील हल्ल्याची चौकशी करण्याची विनंती हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने अमेरिकेच्या न्याय विभागाला केली आहे.
भारतीय दूतावासाने केला घटनेचा निषेध
भारतीय दूतावासाने एक्सवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “न्यूयॉर्कमधील मेलविले येथील BAPS स्वामीनारायण मंदिरातील तोडफोड अस्वीकार्य आहे. दूतावास संबंधित लोकांच्या संपर्कात आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असे भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे. दरम्यान हिंदू फाऊंडेशनने देखील याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “हिंदू संस्थांना नुकत्याच मिळालेल्या धमक्यांनंतर, न्याय विभाग आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने मंदिरावरील हल्ल्याची चौकशी करावी. कारण या आठवड्याच्या शेवटी जवळच्या नासाऊ काउंटीमध्ये मोठ्या भारतीय समुदायाच्या सार्वजनिक सभेचे नियोजन केले आहे.
कॅनडा आणि कॅलिफोर्नियात देखील हल्ले झाले होते
याशिवाय हिंदू आणि भारतीय संस्थांना एक धमकवणारा व्हिडीओ देकील समोर आला आहे. न्यूयॉर्कमधील ही घटना कॅलिफोर्निया आणि कॅनडामधील मंदिरांवर झालेल्या हलल्यासारकीच असल्याचे म्हटले जात आहे. मेलविले हे 16,000-सीट नसाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियमपासून अंदाजे 28 मैल अंतरावर, लाँग आयलंडमधील सफोक काउंटीमध्ये आहे. या स्मारकात 22 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी एका मोठ्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. अशा वेळी ही घटना घडली.