फोटो सौजन्य सोशल मीडिया
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातात Robinson R22 आणि Airbus AS350 प्रकारची दोन हेलिकॉप्टर सहभागी होती. दुपारी साधारण २ वाजून १० ते १५ मिनिटांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. त्यापैकी एक हेलिकॉप्टर प्रशिक्षण उड्डाणावर होते, तर दुसरे देखभालीशी संबंधित कामासाठी उड्डाण करत होते. हवेत दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाल्यानंतर काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळली.
या दुर्घटनेत २२ वर्षीय मॅडी आस्बो या फ्लाइट इन्स्ट्रक्टर, ब्रिटनमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी वैमानिक क्रिस्टोफर जॉफिन आणि ओरेगॉनमधील ३८ वर्षीय वैमानिक टायलर स्टर्डेव्हंट यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तिघांनाही जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास अमेरिकेच्या Federal Aviation Administration (FAA) आणि National Transportation Safety Board (NTSB) कडून केला जात आहे. तपास यंत्रणा हेलिकॉप्टरचे अवशेष, उड्डाणाची माहिती, हवामानाची स्थिती, वैमानिकांचा अनुभव आणि देखभाल नोंदींची तपासणी करणार आहेत. अपघाताच्या वेळी परिसरातील महामार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान, या धडकेमागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेमागील तांत्रिक किंवा मानवी चूक समोर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक अहवाल पुढील ३० दिवसांत प्रसिद्ध होऊ शकतो.






