नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) तात्काळ रिकामे करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तान सरकारने तीव्र संताप व्यक्त केला असून, हा एक आंतरराष्ट्रीय वाद असल्याचा दावा करत भारताच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावरून तीव्र वादंग निर्माण झाले आहे.
भारताचा स्पष्ट इशारा, पीओकेवर बेकायदेशीर कब्जा स्वीकार्य नाही
गेल्या गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक ठाम भूमिका घेत पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारे परकी हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. पाकिस्तानशी आमचा एकमेव संबंध म्हणजे त्यांनी बेकायदेशीररित्या व्यापलेले पीओके रिकामे करावे.”
त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानालाही प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची ‘गळा रक्तवाहिनी’ असे संबोधले होते. जयस्वाल म्हणाले, “कोणत्याही परदेशी गोष्टीला ‘गळ्याची नस’ कशी म्हणता येईल? भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपाचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘सर्वांचे रडगाणे ऐकणार नाही…’ टॉप 15 अर्थव्यवस्थांशीच चर्चा करणार: डोनाल्ड ट्रम्प
पाकिस्तानचे प्रत्युत्तर, काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वाद
भारतीय वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन जारी केले. त्यांनी भारताचे वक्तव्य ‘खोटे आणि निराधार’ असल्याचे सांगत, जम्मू-काश्मीर हे “संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार एक वादग्रस्त क्षेत्र” असल्याचा पुनरुच्चार केला. पाक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “काश्मीरचा अंतिम निर्णय काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार होणे आवश्यक आहे. भारताने अशी विधाने न करता या प्रश्नावर शांततामूलक तोडगा शोधावा.”
🇮🇳 Pakistan will have to vacate Pakistan-occupied Kashmir!
India responds strongly to Pak Army Chief’s remarks.
“POK won’t be freed just by words — force may be needed. The real question is: when will India act?” 💥#AsimMunirpic.twitter.com/fwXTagDJuU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
credit : social media
जनरल असीम मुनीर यांचे पाकिस्तानमधील भावना भडकवणारे विधान
पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधताना म्हटले होते की, “भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे देश आहेत. आपण एक कधीच नव्हतो. पाकिस्तानसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे, आणि देशाच्या रक्षणाचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे.” त्यांनी काश्मीरला ‘पाकिस्तानची गळा रक्तवाहिनी’ असे संबोधले, ज्यावर भारताने तीव्र शब्दांत प्रतिक्रीया दिली आणि त्याला “अस्वीकार्य हस्तक्षेप” म्हणत झिडकारले.
काश्मीर प्रश्नावर कायम असलेले तणावाचे वातावरण
काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 पासून तीन युद्धे होऊन गेली आहेत. भारताने 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यानंतरपासून पाकिस्तानकडून सातत्याने जागतिक पातळीवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, “जम्मू-काश्मीर हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे आणि पीओकेवर पाकिस्तानचा कब्जा बेकायदेशीर आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या यादीत; मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश भारतीय वारशाच्या 14 नोंदी
दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव शिगेला
भारताच्या ‘पीओके रिकामे करा’ या स्पष्ट भूमिकेमुळे आणि पाकिस्तानच्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पाकिस्तान काश्मीरला आंतरराष्ट्रीय वाद ठरवत असेल, तरी भारत या भूमिकेला फेटाळून, आपल्या सार्वभौमत्वाचा पुनरुच्चार करत आहे. येत्या काळात या वादाचे रूपांतर आणखी मोठ्या राजनैतिक संघर्षात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.