Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे. या दहशतवादी कारवायांमध्ये २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला असून, हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारताने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारतर्फे उर्मट आणि आक्रमक भाषा वापरली जात आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, “जर भारताने आमचा पाणी पुरवठा थांबवला, तर आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत. आमच्याकडे गौरी, शाहीन, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व फक्त भारतासाठीच राखून ठेवली आहेत.”
भारताचे जलद प्रत्युत्तर, सिंधू करार रद्द आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने तत्काळ आणि ठाम कारवाई करत सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचबरोबर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देताना भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि शिमला करार अधिकृतपणे रद्द केला. या पावलांनी संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्याचे जाणवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर LoCवर गोळीबार; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
रेल्वे व्यवस्था लष्करी नियंत्रणाखाली : युद्धाची तयारी सुरू
हल्ल्यानंतर पाकिस्तानने देशातील संपूर्ण रेल्वे व्यवस्था लष्कराच्या ताब्यात दिली आहे. रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी सांगितले की, “सर्व रेल्वे स्थानकांवर लष्करी डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. रेल्वेची लॉजिस्टिक क्षमता आता थेट सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली आहे.” यामुळे गरज पडल्यास रणगाडे, जड शस्त्रास्त्रे आणि लष्करी सामग्री थेट रेल्वेमार्गे जलद गतीने हलवता येईल. अब्बासी पुढे म्हणाले, “आमचे अधिकारी पूर्ण सज्ज आहेत आणि लष्कराच्या प्रत्येक आदेशाचे तातडीने पालन केले जाईल.” या हालचालीमुळे पाकिस्तानची युद्धासाठी गंभीर तयारी सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः भारताच्या निर्णायक आणि आक्रमक पावलांनंतर पाकिस्तानच्या घाबरट आणि आक्रमक प्रतिक्रियांनी प्रादेशिक अस्थिरतेची भीती वाढवली आहे.
तणावाची पातळी वाढली, युद्धसदृश वातावरण
भारताने पहलगाम हल्ल्याच्या गंभीरतेची दखल घेत त्वरित कठोर पावले उचलली आहेत. सिंधू करार रद्द करणे आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानची लष्करी लॉजिस्टिक तयारी आणि अण्वस्त्रांची धमकी यामुळे संपूर्ण परिसरात युद्धसदृश तणाव वाढला आहे. विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानचा आक्रमक सूर त्याच्या अंतर्गत असुरक्षिततेचे द्योतक आहे. दहशतवादाला पाठीशी घालण्याचे परिणाम आता पाकिस्तानला भोगावे लागत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जंग करनी है तो…’ भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच ‘मीम अटॅक’, एकदा पहाच
भारत ठाम, पाकिस्तान अस्थिर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयमाने पण कठोर भूमिका घेतली आहे, तर पाकिस्तानने उन्मादी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गौरी, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे’ अशा धमक्यांमुळे पाकिस्तानची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. भारताच्या ठोस कृतीमुळे पाकिस्तानला आता मोठा कोंडीत सापडण्याचा धोका आहे. दक्षिण आशियाच्या भविष्यासाठी हे अत्यंत निर्णायक क्षण आहेत. आगामी काळात भारत-पाकिस्तान संबंध कशा दिशा घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.