Trump Ramaphosa clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीदरम्यान वादावादी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विविध संवेदनशील मुद्द्यांवर झालेल्या या चर्चेमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शब्दांचे बाण चालले, परंतु शेवटी दोघांनीही संयम राखून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
महागड्या विमानावरून वादाची ठिणगी
बैठकीदरम्यान एका पत्रकाराने ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, कतार सरकारकडून त्यांनी $400 दशलक्ष किंमतीचे महागडे विमान स्वीकारले का? या प्रश्नावर ट्रम्प चिडले आणि पत्रकाराला निर्लज्ज संबोधले. त्यांनी पत्रकारांना अशा प्रश्नांची पद्धतच चुकीची असल्याचे ठणकावून सांगितले.
त्यावर उपस्थित असलेले सिरिल रामाफोसा हसत म्हणाले, “माझ्याकडे ट्रम्प यांना देण्यासाठी कोणतेही महागडे विमान नाही.” यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, “जर तुमच्या देशाने अमेरिकन एअर फोर्सला विमान दिले असते, तर मी ते नक्की स्वीकारले असते.” हा विनोदी संवाद काही क्षणांसाठी तणाव कमी करणारा ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकाचा ‘Golden Dome’ कसा ठरू शकतो जागतिक सुरक्षेला नवे आव्हान? वाचा एका क्लीकवर…
शेतकरी हत्यांवरून टोकाचा वाद
या बैठकीदरम्यान खराखुरा तणाव निर्माण झाला तो दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या शेतकऱ्यांवरील कथित हत्यांवरून. ट्रम्प यांनी रामाफोसा यांना एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये गोऱ्या शेतकऱ्यांच्या स्मशानभूमी आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांची दृश्ये दाखवण्यात आली होती. याशिवाय, काही आंतरराष्ट्रीय लेखही त्यांनी दाखवले, ज्यात लक्ष्यित हत्या केल्याचे आरोप होते.
या आरोपांवर रामाफोसा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्रम्प यांना थेट सांगितले, “तुम्हाला सत्य माहिती नाही. दक्षिण आफ्रिकेत गुन्हे होत असले तरी त्याचे बळी बहुतांशी काळे लोकच आहेत.” यावर ट्रम्प यांनी त्यांना मध्येच अडवून दावा केला की, “शेतकऱ्यांच्या हत्या ही लक्षित गुन्हेगारी असून त्यांचे बळी गोरे आहेत.” यामुळे सभागृहात अस्वस्थता आणि तणाव वाढला.
RAMAPHOSA: I am sorry I don’t have a plane to give you
TRUMP: I wish you did. I’d take it. If your country offered the US Air Force a plane, I would take it
RAMAPHOSA: Okay pic.twitter.com/TgvODTok9P
— Aaron Rupar (@atrupar) May 21, 2025
credit : social media
रामाफोसा “बैठक सकारात्मक होती”
जरी चर्चेदरम्यान वाद झाला, तरीही बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामाफोसा यांनी ही बैठक सकारात्मक आणि फलदायी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, संवादामध्ये मतभेद असले तरी तो शांततामय वातावरणात पूर्ण झाला. रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेतील प्रभावशाली आणि संयमी नेत्यांपैकी एक म्हणून ओळख आहे. फेब्रुवारी २०१८ पासून ते राष्ट्राध्यक्षपदावर आहेत, तर २०१७ पासून आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
राजकीय व्यंग आणि गहन प्रश्नांचा मिलाफ
या बैठकीमध्ये एकीकडे विनोदाची झालर होती, तर दुसरीकडे राजकीय आणि मानवाधिकार विषयांवर तीव्र मतभेदही होते. ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अशा वादविवादांनी अनेक द्विपक्षीय बैठकांचे स्वरूप बिघडवले होते, आणि याही बैठकीत तशाच लक्षणांची पुनरावृत्ती झाली. तथापि, रामाफोसा यांच्या शांत आणि मुद्देसूद प्रतिसादामुळे परिस्थिती अधिक चिघळली नाही, आणि ही बैठक ट्रम्प-झेलेन्स्की वादासारखी अर्धवट न थांबता पूर्ण झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल
वैचारिक आणि राजकीय मतभेद
या बैठकीतून स्पष्ट होते की जागतिक नेत्यांमधील वैचारिक आणि राजकीय मतभेद किती तीव्र असू शकतात, विशेषतः जेव्हा विषय संवेदनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असतात. मात्र, या बैठकीतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. राजकारणात मतभेद असूनही, संवादाचे दारे बंद होता कामा नये.