तैवानकडून चीनविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन! अमेरिकेच्या HIMARS रॉकेट आणि अब्राम्स टँकसह सर्वात मोठा युद्धसराव सुरु ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Taiwan Han Kuang drills : चीनकडून मिळणाऱ्या सततच्या युद्धधमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने बुधवारी (9 जुलै) आपल्या इतिहासातील सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. ‘हान कुआंग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सरावात यंदा अनेक नवे विक्रम घडणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकन HIMARS रॉकेट सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, M1A2 अब्राम्स टँक आणि स्काय स्वॉर्ड क्षेपणास्त्रांचं थेट प्रात्यक्षिकही तैवानने जगासमोर ठेवण्याची तयारी केली आहे. हा सराव 9 ते 18 जुलैदरम्यान पार पडणार असून, या दहा दिवसांत तैवानच्या सैन्याकडून प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीची तयारी केली जाईल. यंदा सरावात २२,००० राखीव सैनिक सहभागी होणार आहेत – ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
गेल्या काही वर्षांत चीनने तैवानवर लष्करी दबाव वाढवला आहे. दररोजच्या आधारावर चीन तैवानभोवती युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात करत आहे. अशा पार्श्वभूमीवर तैवानच्या लष्कराने संरक्षणासाठी अधिक गुंतवणूक केली असून, ड्रोन, हलकी पण प्रभावी शस्त्रे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तर कोरियात गुप्त हालचालींना वेग! किम जोंग उनने बदलले बॉडीगार्ड, नेमकं कारण काय?
तैवानचे संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा सराव चीनसह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश देईल की तैवान आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, “तैवानची लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमच्याकडे आत्मविश्वास आणि क्षमता दोन्ही आहेत.”
या युद्धसरावामध्ये अमेरिकेकडून नुकतीच मिळालेली HIMARS (High Mobility Artillery Rocket System) यंत्रणा प्रथमच वापरली जाणार आहे. ही यंत्रणा लॉकहीड मार्टिनने विकसित केली असून, अतिशय अचूक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी ओळखली जाते. यासोबतच अमेरिकेच्या बनावटीचे M1A2 अब्राम्स टँकही यामध्ये वापरले जाणार आहेत. तैवानकडून स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर बनवलेली ‘स्काय स्वॉर्ड’ क्षेपणास्त्र प्रणाली देखील या सरावात सामील असेल, जी जमिनीवरून हवेत मारा करू शकते.
तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते हे सध्या देशाच्या विविध भागांमध्ये दौरे करत असून, देशातील एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी जनजागृती करत आहेत. दुसरीकडे, चीनकडूनही मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली सुरु असून, अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या मते २०२७ हे वर्ष चीनकडून तैवानवर संभाव्य आक्रमणासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गिझा पिरॅमिड्स प्रत्यक्षात कोणी बांधले? शास्त्रज्ञांनी नवीन शोधात केले आहेत मोठे दावे
हा लष्करी सराव केवळ तैवानच्या संरक्षणासाठी नव्हे, तर जागतिक समुदायाला चीनच्या आक्रमकतेविरोधात स्पष्ट संदेश देण्यासाठी केला जात आहे. अमेरिकेच्या थेट मदतीने तैवान स्वतःची ताकद वाढवत असून, लोकशाही व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचा निर्धार करत आहे.