उत्तर कोरियात गुप्त हालचालींना वेग! किम जोंग उनने बदलले बॉडीगार्ड, काय आहे नेमकं कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kim Jong Un bodyguard change : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या सुरक्षा यंत्रणेत मोठा आणि धक्कादायक बदल केला आहे. वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटनांमुळे आणि इराणी कमांडर्सवर झालेल्या अलीकडच्या हल्ल्यांनंतर त्यांनी आपल्या मुख्य अंगरक्षकाची तातडीने बदल करून, संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे.
उत्तर कोरियामधील गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, किम जोंग उन यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतरच त्यांनी आपल्या सुरक्षा पथकातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, किमने आपल्या मुख्य अंगरक्षकाची नेमणूक एका नव्या आणि अत्यंत गुप्ततेत काम करणाऱ्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याकडे दिली आहे. या अधिकाऱ्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु ते सिंगापूर, व्हिएतनाम आणि रशियात किमसोबत गुप्त मिशन्सवर कार्यरत होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गिझा पिरॅमिड्स प्रत्यक्षात कोणी बांधले? शास्त्रज्ञांनी नवीन शोधात केले आहेत मोठे दावे
किम जोंग उन यांची सुरक्षा व्यवस्था जगातील सर्वात कठोर आणि थरारक सुरक्षांपैकी एक मानली जाते. त्यांची सुरक्षा तीन थरांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या थरात फक्त १२ सैनिक असतात, जे किमजवळ राहतात आणि त्यांनाच शस्त्र बाळगण्याची परवानगी असते. हे सैनिक विशेष प्रशिक्षण घेतलेले असून, त्यांची उंची किमइतकीच असते. यामागचा उद्देश म्हणजे कोणताही हल्लेखोर किमला अचूक लक्ष्य करू शकू नये. याशिवाय, किमच्या अंगरक्षकांची निवड करताना त्यांची कुटुंबेही तपासली जातात. अशा सैनिकांनाच निवडले जाते ज्यांच्या किमान दोन पिढ्या उत्तर कोरियाच्या सरकारशी निष्ठावान राहिल्या आहेत. हे दर्शवते की किम आपल्या भोवती फक्त पूर्णतः विश्वासू लोकांनाच ठेवतात.
किमने आपल्या जुन्या मुख्य अंगरक्षक किम चोल ग्यू यांची बदली राज्य व्यवहार आयोगाच्या गार्ड विभागात केली आहे. हा बदल केवळ एक औपचारिक पायरी नसून, एक गंभीर धोका टाळण्यासाठी घेतलेले टोकाचे पाऊल असल्याचे अनेक सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे.
किम जोंग उन यांचे जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याशी प्रखर वैर आहे. या पार्श्वभूमीवर टार्गेट किलिंग आणि हेरगिरीची भीती उत्तर कोरियात वाढली आहे. अलीकडेच इराणमध्ये उच्च दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे किमने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पकडा आणि सरळ गोळी मारा..’ शेख हसीनांचा लीक ऑडिओ इंटरनेटवर जोरदार VIRAL
किम जोंग उन यांच्याकडून घेतलेले हे पाऊल केवळ सुरक्षा बदल नाही, तर उत्तर कोरियाच्या गुप्त आणि धोकादायक राजकीय वातावरणाचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढती अस्थिरता आणि गुप्तचर कारवायांमुळे आता प्रत्येक हुकूमशहा अधिक सावध झाला आहे. किमने आपल्या अंगरक्षकांची फेरबदल करून, पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय की उत्तर कोरियेत काहीही होऊ शकतं आणि तेही कुणालाही कळायच्या आत!