Tokyo School Fire: टोकियोत ४ मजली प्राथमिक शाळेला आग; ३३० जणांची सुखरूप सुटका, १० चिमुरडे जखमी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Tokyo school fire Takinogawa Daisan elementary school : जपानची राजधानी टोकियो (Japan, Tokyo) मधून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. टोकियोमधील उत्तर वॉर्ड ‘किता’ (Kita Ward) भागात असलेल्या ‘ताकिनोगावा दाइसान प्राथमिक शाळेत’ (Takinogawa Daisan Elementary School) शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा शाळेचे नियमित वर्ग सुरू होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे चार मजली शालेय इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून काळ्या धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या. यामुळे संपूर्ण परिसरात आणि शाळा प्रशासनामध्ये प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले होते.
आग लागली तेव्हा संपूर्ण शाळेत सुमारे ३३० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच टोकियो अग्निशमन दलाच्या डझनाहून अधिक गाड्या आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की, काही मिनिटांतच चौथ्या मजल्यावरील सुमारे २०० चौरस मीटरचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला. सुदैवाने, जपानी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने अत्यंत तत्परतेने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार, या आगीची सुरुवात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील संगीत कक्षाजवळ (Music Room) झाली. तिथे उपस्थित असलेल्या सहावीच्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, “आम्ही संगीत कक्षापासून दोन खोल्या दूर होतो. अचानक आम्हाला काहीतरी जळण्याचा वास आला, सुरुवातीला वाटले कोणीतरी जेवण बनवत आहे, पण लगेचच धोक्याचा सायरन वाजला.” सायरन वाजताच शिक्षकांनी सर्व मुलांना तोंड रुमालाने झाकून पायऱ्यांवरून खाली उतरण्याचे निर्देश दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Times Square Firing: पर्यटकांची पळापळ अन् किंकाळ्या! टाईम्स स्क्वेअर गोळीबाराने हादरली अमेरिका; थरारक VIDEO आला समोर
मात्र, आग चौथ्या मजल्यावर लागल्यामुळे काही विद्यार्थी आणि एक शिक्षक तिथेच अडकले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी काही लहान मुलांनी खिडकीतून बाहेर येत खालील काँक्रीटच्या अरुंद पट्टीवर (Ledge) आश्रय घेतला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शिड्या लावून या मुलांना आणि शिक्षकाला अत्यंत सुरक्षितपणे खाली उतरवले. तर उर्वरित ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःहून अत्यंत शिस्तीत इमारत रिकामी केली आणि शाळेजवळील एका उद्यानात सुरक्षितपणे पोहोचले.
WATCH: Fire has erupted at an elementary school in Tokyo, Japan; reports indicate children remain trapped inside. pic.twitter.com/4tIQutRUun — Scope Report (@ScopeReport_) June 19, 2026
credit – social media and Twitter
या भीषण दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. यामध्ये धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या ७ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या घाईत एका विद्यार्थ्याला किरकोळ फ्रॅक्चर (अस्थिभंग) झाले असून इतर दोन शिक्षकही जखमी झाले आहेत. जखमीनं तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून कोणाच्याही जीवाला कोणताही धोका नाही.
ज्यावेळी ही आग लागली, तेव्हा घटनास्थळावरून थेट दूरचित्रवाणी वाहिन्यांवर (TV Footage) आणि सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित होत होते. खिडक्यांमधून निघणारा प्रचंड काळा धूर पाहून पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेकडे धाव घेतली. आकाशात हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत होते आणि पालक आपल्या घाबरलेल्या मुलांना कवेत घेण्यासाठी व्याकुळ झाले होते. मात्र, शाळा प्रशासनाने सर्व मुलांची अचूक मोजणी करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Anupama Singh: ‘काश्मीर आमचेच, दहशतवाद पसरवून सिंधू करार टिकणार नाही’, UN मध्ये भारताच्या वाघिणीसमोर पाकिस्तानची बोलती बंद
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, चौथ्या मजल्यावर पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असतानाच आगीचा उगम झाला. प्रत्यक्षदर्शी मुलांच्या म्हणण्यानुसार, संगीत कक्षाच्या बाजूला असलेल्या मल्टी-पर्पज (बहुउद्देशीय) रूम आणि संगीत कक्षाच्या दरम्यान अचानक एक मोठा ‘बँग’ (Explosion) सारखा आवाज झाला आणि त्यानंतर वेगाने आग पसरली. या आवाजामुळे बहुधा शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या टोकियो पोलीस आणि अग्निशमन दलाचे विशेष पथक या आगीचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत. जपानमधील शाळांमध्ये नियमितपणे भूकंप आणि आग यांसारख्या आपत्तींसाठी मॉक ड्रील (सराव) घेतले जातात. याच प्रशिक्षणामुळे आज ३३० पेक्षा जास्त मुलांचा जीव अगदी काही मिनिटांत वाचवण्यात यश आले, ज्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.






